आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गोठली माणुसकी:कोरोनाने मृत्यू नसूनही कुणी खांदा देईना, पत्नीने हातगाडीवरून नेला पतीचा मृतदेह

प्रिया सरीकर | कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • रस्त्यावर बघ्यांनी फोटो काढले, व्हिडिओ केला, पण कुणाच्याही हृदयाला फुटला नाही पाझर

माणसाच्या मनातील कोरोनाची भीती आता त्याच्यातील माणुसकीवरही स्वार होऊ लागली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे एका गरीब मजुराचा अन्न, उपचाराअभावी मृत्यू होतो आणि खांदा द्यायला कुणी न आल्याने हातगाडीवरून त्याची अंत्ययात्रा निघते, ही घटना त्याचीच प्रचिती आणून देणारी आहे. रस्ते आणि दुकाने ‘लॉकडाऊन’ झाली असली तरी सोशल मीडियाच्या पलीकडे, वास्तवात संवेदनशीलतेची, सहवेदनेची वाट अन् माणुसकीचा व्यवहार कधी नि कसा ‘अनलॉक’ होणार, हा प्रश्न यातून उभा राहिला आहे.

कोरोनाने आपल्या अवतीभोवती अनेक कहाण्या उभ्या केल्या आहेत. काही मनाला वेदना देणाऱ्या.. काही विषण्ण करणाऱ्या.. तर काही आपल्यातील माणूसपण संपवूनच ही महामारी जाणार की काय, अशी भीती वाटायला लावणाऱ्या.. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर तिच्या सामाजिक, आर्थिक स्तरावर उपचारांची अन् बरे होण्याच्या शक्यतेची दिशा ठरत असेल तर यापेक्षा वाईट काय असू शकते? त्यातच कोरोना नसलेल्या माणसांचं आजारपण, त्यांना सहजासहजी न मिळणारे उपचार आणि मरणानंतरही न संपणाऱ्या यातना हे वास्तव भयावह बनू लागलं आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावची ही घटना त्याचेच उदाहरण मानावे लागेल. कोरोनाने जगण्याच्या लढाईतील रोजची कष्टाची कमाई हिरावल्याने अन्नपाण्याशिवाय आणि दवाखान्यांनी नाकारल्याने उपचाराविना तडफडून मृत्यू झालेल्या सदाशिव होरटी (५५) या कष्टकऱ्याला खांदा द्यायला शेजारी तर सोडाच, नातेवाइकांपैकी चार माणसंही आली नाहीत . अखेरच्या प्रवासासाठी शववाहिकाही मिळाली नाही. शेवटी सदाशिव यांच्या पत्नीने कुणाच्या हातापाया पडून एक हातगाडी मिळवली नि तिच्यावरूनच पोत्यात बांधलेल्या कष्टकऱ्याच्या कलेवराची अंत्ययात्रा निघाली. सदाशिव यांची पत्नी, मुलगा आणि हातगाडी ढकलणारा एक जण एवढेच त्यात सामील होते. पुढं बघून ते हातगाडी रेटत होते अन् रस्त्याच्या बाजूला असलेले लोक फोटो काढत होते. पण, ‘कडक लॉकडाऊन’मुळे कुणी मदतीला येऊ शकत नव्हते. स्मशानात गेल्यावर पत्नीनेच पतीवर अंत्यसंस्कार केले.. आणि अखेरपर्यंत छळणाऱ्या जगण्यातून नि मरणानंतरही टाळणाऱ्या दुनियेतून एका घुसमटलेल्या जिवाची सुटका झाली...