आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल:म्हणाले - धर्माच्या नावाने लोकांमध्ये अंतर निर्माण केले जातेय, धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे

सांगली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली दौऱ्यावर आहे. त्यांच्या दौऱ्यांची सुरवात शिराळा येथून झाली. शरद पवारांच्या उपस्थित शिराळा येथे भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी संबोधन करताना शरद पवार यांनी विरोधकांवर टीका केली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, राजाराम बापू या नेत्यांनी विकासाचं व माणसं जोडण्याचं राजकारण केलं. आज मात्र देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले जात आहे. लोकांमध्येही त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता आहे. देशामध्ये आता धर्मांध प्रवृत्ती वाढत आहेत. लोकांमध्ये धर्माच्या नावाने अंतर निर्माण केले जात आहे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात आता आगामी काळामध्ये लढाई लढावी लागेल, असे पवार म्हणाले. तसेच सामाजिक ऐक्य धोक्यात आल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपवाल्या सारखे आम्ही बोलत नाही -
शिवाजीराव नाईक यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची यशाची गुढी राज्यात भक्कम होईल. ते यशस्वी जिल्हा परिषद अध्यक्ष होते. सहकार, पंचायत राज, कृषी, औद्योगिक क्षेत्रातील कामाचा त्यांचा अनुभव मोठा आहे. ते पुन्हा आपल्या घरी आले आहेत. सर्वांना सोबत घेत मतदारसंघातील जनतेचे हित जपण्याचे काम ते करतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच शिवाजीराव नाईक यांनी जनतेच्या प्रश्नांवर कायम संघर्षाची भूमिका घेतली. ते कोठेही गेले तरी त्यांना माझ्या घरात यावे लागणार, ही मला खात्री होती. भाजप सोडून ते राष्ट्रवादीत आल्याने आम्हाला अनुभवी नेत्याचे मार्गदर्शन लाभेल. भाजपवाल्या सारखे आम्ही बोलत नाही, तर थेट करून दाखवतो, असा टोला पवारांनी भाजपला लगावला.

साखर कारखानादारांना शरद पवारांचा सल्ला -

एकेकाळी या भागात पाणीप्रश्नावर संघर्षाची भूमिका घेतली जायची. पाण्याविना तहानलेली शेती ही समस्या या भागात फार मोठ्या प्रमाणात होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपण सगळ्यांच्या प्रयत्नांनी बऱ्याचशा प्रश्नांची सोडवणूक या भागात झालेली आहे, असे पवार म्हणाले. तसेच ऊस शेती वाढत आहे, मात्र वाढणाऱ्या क्षेत्रातील ऊसाच गळीत आता कसे होईल यांची चिंता आहे. गळीत हंगाम दोन महिने पुढे सुरू ठेवावे लागतील. त्यामुळे ऊस शेती बाबत विचार करणं गरजेच आहे. फक्त ऊसापासून फक्त साखर करून चालणार नाही, तर उप पदार्थ करावे लागतील, असा सल्ला यानिमित्ताने शरद पवारांनी साखर कारखानादारांना दिला.

बातम्या आणखी आहेत...