आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासऱ्यांच्या अटकेनंतर व्यथित:पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजितही भाजपच्या वाटेवर?

सांगली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेमध्ये उभी फूट पाडून भाजपने राज्यात सत्तांतर घडवून आणले. आता हे सरकार स्थिर करण्यासाठी काँग्रेसमधून काही आमदार गळाला लागतात का, याची चाचपणी सुरू आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावासोबतच काँग्रेसमध्ये कायम ‘वेटिंग चीफ मिनिस्टर’ राहिलेल्या कै. पतंगराव कदम यांचे चिरंजीव माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नावाची चर्चाही जोरात सुरू आहे. डॉ. पतंगराव कदम आणि त्यांचे संपूर्ण घराणे हे काँग्रेसनिष्ठ घराणे म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या वेळी विश्वजित कदम यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती, परंतु कदम घराणे हे काँग्रेसशी आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहे आणि आपण काँग्रेसच्या प्रवाहातच

राहणे हे आपल्या मतदारांना रुचणारे आहे, असे प्रतिपादन त्या वेळी विश्वजित यांनी केले होेते. दरम्यानच्या काळात कृष्णा नदीच्या प्रवाहातून बरेचसे पाणी वाहून गेले. फडणवीस यांच्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रिपदही प्राप्त झाले. परंतु काही महिन्यांतच त्यांचे सासरे तथा पुण्याचे उद्योगपती अविनाश भोसले हे ईडीच्या रडारवर आले. विश्वजित मंत्री असतानाही भाेसलेंना जेलमध्ये जावे लागले आहे. आपले सासरे तसेच आपल्या घराण्याचे हित लक्षात घेता विश्वजित कदम भारतीय जनता पक्षात आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह प्रवेश करतील, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.

पक्षनिष्ठेपेक्षा घराण्याच्या हिताला महत्त्व देशात पुन्हा एकदा मोदी सरकार २०२४ मध्ये आरूढ होऊ शकते हे ध्यानात घेऊनच विश्वजित कदम पक्षनिष्ठेपेक्षा घराण्याचे हित अधिक महत्त्वाचे आहे आणि अविनाश भोसले यांच्या मागील ईडीचा ससेमिरा कायमचा चुकवण्यासाठी येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाल्यास अनुभवी राजकारण्यांना आश्चर्य वाटणार नाही, असे सांगितले जात आहे.

अशोक चव्हाण यांच्यानंतर विश्वजित कदमांकडेही नजरा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली होती. त्यामुळे चव्हाण भाजप किंवा शिंदे गटात सहभागी होणार अशी चर्चा सुरू असतानाच आता विश्वजित कदम यांच्याबाबतीतही पुण्यासह प. महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत विश्वजित कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...