आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इशारा:खासगी डॉक्टरांनो सेवा देण्यासाठी पुढे या, अन्यथा मेस्मा लावावा लागेल; ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोरोनाचा कहर वाढतच आहे. अशा परिस्थितीत टोकाचे प्रयत्न करूनही सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे 'खाजगी डॉक्टरांनो, सेवा देण्यासाठी पुढे या अन्यथा नाईलाजास्तव मेस्मा कायदा लावावा लागेल', असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर जर सरकारी कोविड केअर सेंटरमधून सेवा देणारच नसतील तर मग मात्र नाइलाजाने त्यांना मेस्मा लावावा लागेल. या कायद्यामध्ये डॉक्टरांची रजिस्ट्रेशन रद्द करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रकात म्हटले आहे, खाजगी डॉक्टरांनी करावयाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना लक्षणे आहेत त्यांना सरळ कोरोनाचेच उपचार सुरू केले पाहिजेत. कारण; स्वॅबचा रिपोर्ट येण्यास वेळ लागतो. तोपर्यंत संबंधित रुग्ण अत्यवस्थ होतो किंवा दगावतो. रुग्ण अत्यवस्थ होण्याचे आणि दगावण्याचे सर्वात मूळ कारण यामध्येच आहे.

खाजगीत तर बेडच मिळत नाहीत कारण पैसेवाले लोक तिकडे जाणार. सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा हेच केलं पाहिजे. सरकारी फिजिशियन आणि एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता आहे. म्हणावी तेवढी डॉक्टरांची संख्या नाही. एमबीबीएस गुणवत्ताधारक डॉक्टरांना शासन दरमहा ६० हजार रुपये देते तर एमडी गुणवत्ताधारक डॉक्टरांना शासन दरमहा दोन लाख रुपये देते. तरीही हे यायला तयार नाहीत. त्यांनी काय करायचं तर फक्त एक्स-रे बघायचा आणि औषधोपचाराचा प्रोटोकॉल बघायचा आहे. यांच्याशिवाय एक्स-रे दुसरं कोण बघणार?

२२ मार्च २०२० पासून म्हणजेच गेल्या पाच महिन्यांपासून हे सगळेजण कोरोना संसर्गाच्या महामारीशी प्राणपणाने लढत आहेत. तरीसुद्धा इतका मोठा कडेलोट झालेला आहे. याची जाणीव सुद्धा आम्हाला आहेत. परंतु; जोपर्यंत कोरोना संसर्गावर आपण अंतिम विजय मिळवीत नाही, तोपर्यंत हे निकराचे युद्ध सुरूच ठेवावे लागेल. गेल्या सहा महिन्यात डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सर्वच पातळ्यांवर काम करणारे कोरोना योद्धे अक्षरशः थकलेले आहेत. तुमच्या या कामाला माझा सलाम आहे. वास्तविक अंतिम लढाई ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे विजय दृष्टिक्षेपात दिसत आहे असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

0