आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरची मान उंचावली:कोरोनात 300 जणांवर अंत्यसंस्कार करणारी प्रिया राज्याची सदिच्छा दूत

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात जेव्हा सख्खे शेजारी, रक्ताची नाती परकी झाली होती, अशा कठीण काळात कोरोना मृतांची सर्वत्र प्रचंड हेळसांड झाली. पण सख्ख्या नात्यांच्या पुढे जाऊन कोल्हापूरच्या प्रिया पाटील या तरुणीने तीनशेहून अधिक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले. इतकेच नाही तर रुग्णवाहिका स्वतः चालवत ती मृतांना अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्याचीही सेवा बजावत होती. तिच्या या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये युवकांना सहभागी करण्यासाठी आणि शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोल्हापूरच्या प्रिया पाटील हिची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रिया पाटील महाविद्यालयात बीएस्सीच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. तिच्या या सामाजिक कार्याची दखल शासनाने घेतली. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आयोजित करणे, विद्यार्थी व युवकांशी संवाद साधणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमार्फत शासनाच्या विविध योजना, उपक्रम, उद्दिष्टे साध्य करण्याचे काम सदिच्छादूत म्हणून प्रिया पाटील करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...