आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली:राजभवन म्हणजे भाजपचा अनधिकृत ‘अड्डा’च : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

सांगलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पटोले पुन्हा भाजपमध्ये येऊ शकतात : मंत्री रामदास आठवले

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे राज्यपालपदाचा संविधानिक अवमान होत आहे. त्यांचे पक्षपाती निर्णय हे दिल्लीच्या इशाऱ्यावरून सुरू आहेत. राजभवनाला अनधिकृतरीत्या ‘भाजपचा अड्डा’ बनवले जात आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर नाना पटोले हे प्रथमच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे अत्यंत काटेकोरपणे निवडण्यात आली. मात्र, गेले पाच महिने मंत्रिमंडळाच्या या ठरावाकडे राज्यपालांनी लक्षही दिले नाही. राज्यपालांच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाणे आघाडी सरकारला योग्य वाटत नाही, परंतु राज्यपालांनी असाच मनमानी -पक्षपाती कारभार सुरू ठेवला तर आमच्यापुढे पर्याय राहणार नाही, असा इशाराही पटोले यांनी या वेळी दिला.

आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या विविध पक्षांतील आमदारांना फोडण्याचे षड्यंत्रही रचले गेले होते. मात्र, त्यांचे ‘ऑपरेशन लोटस’ फेल गेले आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेतच राष्ट्रपती राजवटीची भीती घालत आहेत. हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे.

पटोले पुन्हा भाजपमध्ये येऊ शकतात : मंत्री रामदास आठवले
सांगली| काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये येऊ शकतात, असे विधान केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले रविवार सांगलीत केले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी आमची इच्छा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आपला ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या झंझावातापुढे हे सरकार निश्चितच कोसळणार आहे. राज्यात कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना हे सरकार उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आठवले यांनी या वेळी सांगितले.

शरद पवार यांना आपली चूक समजली
महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना शिवसेनेला मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद, तर काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मध्यंतरी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी अध्यक्षपद हे तिन्ही पक्षासाठी खुले आहे, असे वक्तव्य केले होते. परंतु नंतर त्यांना आपली चूक समजल्यानंतर त्यांनी हे विधान मागे घेतले आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसचेच आहे. महाराष्ट्र विधानसभेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आघाडी सरकारजवळ १७१ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात विशेष अधिवेशनाद्वारे काँग्रेसला अध्यक्षपद दिले जाईल, असा ठाम विश्‍वासही पटोले यांनी बोलून दाखवला.

बातम्या आणखी आहेत...