आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय धुरळा उडाला:राज ठाकरे व्याख्यान देतात अन् तीन-चार महिने भूमिगत होतात, त्यांचं हेच वैशिष्ट्य आहे : शरद पवार

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे हे बरेच महिने कुठे भूमिगत झाले होते याचा काही कुणाला अंदाज येत नव्हता. त्यांचं हेच वैशिष्ट्य आहे की, दोन-चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने काय करतात मला माहीत नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्षांवर केली.

गुढीपाडव्या निमित्त शनिवारी मुंबईत मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. राज ठाकरेंच्या सभेनंतर राजकीय धुरळा उडाला असून राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनीही राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण वाढले, त्यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला अशी टीका करून यासाठी शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या टीकेला शरद पवारांनी रविवारी कोल्हापूर येथे जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीला जातीयवाद हवा आहे की नाही, याबाबत राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षांतील राष्ट्रवादीचा इतिहास तपासावा. राज ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य नसते, जाती-पातीच्या पलीकडे जाऊन आपण भारतीय आहोत ही भावना रुजवायला हवी, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरची पक्षातील नेत्यांची यादी वाचून दाखवताना त्यांनी विविध जाती-धर्मातील नेत्यांची नावे सांगितली. यामध्ये मधुकर पिचड, छगन भुजबळ, अरुण गुजराथी, अजित पवार यांचा प्रामुख्याने समावेश होता. विविध जाती-जमातींच्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा राष्ट्रवादीचा दृष्टिकोन आहे आणि पुढेही राहील, असे पवार म्हणाले.

अक्कलदाढ उशिरा कशी येते हे बघावे लागेल : संजय राऊत
आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अडीच वर्षांनंतर राज ठाकरे काय बोलत आहेत? अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते हे बघावे लागेल,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली. भाजप मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढते हे मनसेच्या मेळाव्यातून स्पष्ट दिसते. भाजपचीच ही स्क्रिप्ट होती.

ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात : अजित पवार
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतली. विधानसभेवेळी त्यांनी काय केले ते आपण पाहिले. नकला आणि टीकेशिवाय त्यांना काही जमत नाही. राज ठाकरे सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

... इकडे गडकरी-राज ठाकरे भेट ! : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी भाजपबाबत सॉफ्ट कॉर्नर घेत महाविकास आघाडीला टार्गेट केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...