आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Raju Shetty And Sadabhau Khot Face Each Other On The Issue Of Milk ; Leaders Who Once Came Together On The Question Of Agriculture Now Face Each Other

दिव्य मराठी विशेष:दुधाच्या मुद्यावर शेट्टी, खोतांचा सामना; कधी शेती प्रश्नावर एकत्र आलेले नेते आता आमने सामने

सांगली, कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुधाची 30 रुपये लिटरने खरेदी करा : खोत

उसाला हमी भावापेक्षा अधिक दर मिळावा यासाठी दहा वर्षांपूर्वी संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आता दुधाच्या दरावरून स्वतंत्र आंदोलन छेडणार आहेत. या गुरू-शिष्याच्या नात्यात गेल्या पाच वर्षांत कडवा संघर्ष निर्माण झाल्यानंतर हे दोन नेते शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर स्वतंत्र आंदोलन छेडणार असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खरे नेते कोण? हे निश्‍चित होणार आहे.

दुधाला मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत सर्वोच्च दर मिळतो आणि दूध उत्पादकांना हा काळ सुगीचा ठरतो. परंतु, याच काळात देशभरात कडक “लॉकडाऊन’चे निर्बंध असल्यामुळे अत्यंत कमी भाव मिळाला. परंतु, उत्पादित झालेल्या दुधाचे करायचे काय? हा यक्ष प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला होता. केवळ उसाच्या दरावरून संघर्ष करणाऱ्या या शेतकरी नेत्यांना आता दुधाच्या दराचा प्रश्‍न कळीचा वाटू लागला. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी अग्रेसर असलेल्या राजू शेट्टी यांनी दुधाचा प्रश्‍न हाती घेतल्यानंतर तातडीने रयत संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनीही आंदोलनात उतरण्याचा आणि आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याचा विडा उचलला आहे.

दुध दरात अचानक घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुधाला अनुदान देण्याच्या मागणीवरून राजू शेट्टी यांनी सर्वप्रथम आवाज उठवला. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनीही तातडीने या आंदोलनात उडी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या भावनांना हात घालणारा हा मुद्दा असल्याने हे दोन्ही नेते पूर्ण ताकदीने या आंदोलनात उतरले आहेत. अनुदान कोण मिळवून देतो. त्यावरच दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते कोण याचे भवितव्य ठरणार आहे.

ऊस उत्पादकांच्या आंदोलनात कडवा संघर्ष करण्यात शेतकरी संघटनेचे सर्वोच्च नेते शरद जोशी हे कमी पडत आहेत. या मुद्यावरून राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेची स्थापना केली. २०१० च्या दशकात राजू शेट्टी यांचे अत्यंत जिवाभावाचे मित्र असलेले सदाभाऊ खोत यांच्याबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांना नमवून ऊस उत्पादकांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा अधिक दर मिळवून देण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना यशस्वी ठरली. आणि बघता बघता या संघटनेने राज्य व्यापले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाचे समर्थन करीत युती केली. पुढे राज्यातही भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारला डोकेदुखी ठरणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पाडण्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. सदाभाऊ खोत यांचा मंत्रिमंडळात समावेश करून शेट्टींना शह दिला.

दुधाची ३० रुपये लिटरने खरेदी करा : खोत

दुधाला प्रति लिटर पाच रुपये तातडीने अनुदान द्यावे या मागणीसाठी राजू शेट्टी हे श्रावणाच्या पहिल्या दिवशी दि. २१ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप न केल्यास टाळेबंदी मोडून दूध बंद करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केवळ राज्य शासनावर तोफ डागत एक आॅगस्टपासून आपणही या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष व भारतीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडणार आहे.