आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलपाखरू संवर्धन:महादरेला फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून मान्यता; दुर्मिळ 178 प्रजाती

सातारा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा शहराजवळच्या दरे (खुर्द) महादरे (ता. सातारा) परिसराला फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. महादरे खोऱ्यात विविध जैव विविधता आढळून येते. त्याचा अभ्यास व संशोधन महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) ही संस्था २०१७ पासून करीत आहे. या परिसरात फुलपाखरांच्या सर्वात जास्त म्हणजेच एकूण पश्चिम घाटात आढळणाऱ्या ३४१ प्रजातींपैकी १७८ प्रजाती या एकट्या महादरेमध्ये आढळून आल्या. त्यामुळे हा परिसर फुलपाखरांसाठी राखीव करावा, असा प्रस्ताव मेरी व सातारा वन विभागाच्या वतीने २०२१ मध्ये शासनास सादर करण्यात आला होता. मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये सदर प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. ‘भारतातील पहिले फुलपाखरू संवर्धन केंद्र साताऱ्यात आहे याचा आनंद वाटतो. नव्या निर्णयामुळे साताऱ्यात पर्यटनाला चालना मिळेल, असे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी सांगितले. मेरीचे अध्यक्ष सुनील भोईटे, डॉ. प्रतिमा पवार व डॉ. नेहा बेंद्रे यांनी मुक्त संशोधकांच्या मदतीने हे संशोधन केले आहे.

परिसरात उभयचर, सहस्रपाद, कोळी, पक्ष्यांसह मोठी जैवविविधता
महादरे हे तुलनेने एखाद्या अभयारण्य क्षेत्रापेक्षा अत्यंत कमी म्हणजे जवळपास १०५ हेक्टर व परिसरात पसरलेल्या जंगलामध्ये एकूण ४६७ प्रकारच्या वनस्पती प्रजाती आढळून आल्या. यातील बऱ्याचशा प्रदेशानिष्ठ, दुर्मिळ व औषधी वनस्पती आहेत. तर सुमारे ४७ रानभाज्यांची नोंद या परिसरात करण्यात आली. सस्तन वन्यप्राण्यांच्या २० प्रजाती, पक्ष्यांच्या ११८ प्रजाती, सरपटणारे-उभयचर १६ प्रजाती, मासे २२ प्रजाती, सहस्रपाद ३ प्रजाती, पतंग ८० प्रजाती, कोळी ११० प्रजाती आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे फुलपाखरांच्या सर्वात जास्त म्हणजेच एकूण पश्चिम घाटात आढळणाऱ्या ३४१ प्रजातींपैकी १७८ प्रजाती या एकट्या महादरेमध्ये आढळून आल्या.

अशा आहेत प्रजाती
या परिसरात क्रिमसन रोज, मलाबर बँडेड पिकॉक, तमिळ स्पॉटेड फ्लॅट, सदर्न बर्डविंग ही प्रदेशानिष्ठ (एंडेमिक) फुलपाखरे, भारतातील आकाराने सर्वात छोटे स्मॉल ग्रास ज्वेल, तर सर्वात मोठे सदर्न बर्डविंग हे फुलपाखरू आढळते. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन, भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत संरक्षित असणारी अर्थात वाघाच्या बरोबरीने संरक्षण असणारी ऑर्किड टिट व व्हाइट टीपड लाइन ब्लू ही अतिशय दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरे या ठिकाणी दिसून येतात. फुलपाखरांना सामान्यतः अधिवासाचे निर्देशक मानले जाते. यासह परागीभवनामध्ये देखील त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.

बातम्या आणखी आहेत...