आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॅन विथ बिअर्ड...सध्या जगभरात दाढीवाल्यांचा जमाना आहे. दाढी वाढवणं हे केवळ फॅशनचा भाग नाही तर ते संयम, धैर्य आणि जिद्द यांचे प्रतीक मानले जाते. अशाच दाढीवाल्यांकडून नो शेव्ह नोव्हेंबर.... नावाने जगभरात चालणारी ही मोहीम कोल्हापूरच्या तरुणांसाठी मात्र जिद्द बनली आहे. याच जिद्दीने कोल्हापूरच्या दाढीवाल्या तरुणांनी केलेल्या बचतीतून गेल्या पाच वर्षांत २५ कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरातील ५०० हून अधिक तरुण एकत्र येत कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करत आहेत. “नो शेव्ह नोव्हेंबर’ असे त्यांच्या मोहिमेचे नाव आहे. कोल्हापुरात ही मोहीम दरवर्षी चांगलीच चर्चेत असते. दरवर्षी एक महिना दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून ते पैसे मदत म्हणून कॅन्सरग्रस्त रुग्णांना देतात अशी ही मोहीम आहे. या वर्षीसुद्धा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे आणि कोल्हापूर प्रेस क्लब पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ६ रुग्णांना प्रत्येकी १० हजार रुपये मदत करण्यात आली. या वेळी मान्यवरांनी या मोहिमेचे कौतुक करत यापुढच्या काळातसुद्धा ही मोहीम अधिकाधिक मोठी व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.
नेमकी काय आहे हे पाहूयात
काय आहे “नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम : जगभरात नोव्हेंबर महिन्यात “नो शेव्ह नोव्हेंबर’ ही मोहीम सुरू असते. याच मोहिमेचे कोल्हापुरातील तरुणांनी ५ वर्षांपूर्वी अनुकरण करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या मोहिमेला आजपर्यंत कोल्हापुरातील पाचशेहून अधिक तरुणांनी पाठिंबा दिला आहे आणि दरवर्षी ही संख्या वाढतच चालली आहे. याअंतर्गत दरवर्षी एक महिना दाढी न करता दाढीसाठी जेवढे पैसे खर्च होतात ते वाचवून ती रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली. सुरुवातीला या मोहिमेबद्दल माहिती मिळाल्यानंतर शेखर पाटील आणि दर्शन शहा यांनी हा विचार त्याच्या मित्रमंडळींना बोलून दाखवला होता. त्यानुसार हा विचार एका मोहिमेत बदलला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी आपण ही मोहीम सुरू करू, असा निर्णय सर्वांनी केला. त्यानुसार सलग ५ वर्षे ही मोहीम अगदी उत्साहाने राबवण्यात येत आहे. दरवर्षी याला प्रतिसाद वाढतच आहे.
पोलिसांसह वकील, डॉक्टर, पत्रकारही सहभागी
या मोहिमेबाबत समजताच अनेकांकडून याचे कौतुक झाले. यामध्ये अनेक जण जोडले गेले. यामध्ये अनेक क्षेत्रांतील तरुण सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांपासून वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, सीए, पत्रकार, राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्तेसुद्धा जोडले गेले असून तेसुद्धा आपल्या परीने दाढीवर होणारा एक महिन्याचा खर्च वाचवून मोहिमेला देत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.