आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील सेन्सॉर बोर्डावर विश्वास नाही:'हर हर महादेव'मधील विकृत इतिहास आज घरोघरी जाणार, संभाजीराजे छत्रपतींची टीका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केल्यानंतरही 'हर हर महादेव' हा सिनेमा आज टीव्हीवर प्रदर्शित आहे. यावरून आज पुन्हा नाराजी व्यक्त करून संभाजीराजे छत्रपती यांनी आता दिल्लीतील सेन्सॉर बोर्डावर विश्वास राहिला नाही. आधी महाराष्ट्रात अशा चित्रपटांची स्क्रिनिंग करायला हवी, अशी मागणी केली.

शिंदे-फडणवीसांना पत्र पाठवले

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, जवळपास एक महिन्यापूर्वी आम्ही हर हर हर महादेव हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नका, अशी मागणी केली होती. त्यानंतरही केवळ सेंट्रल सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे, असे सांगत हा चित्रपट आज घराघरात पाहिला जाणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास पसरवला जाणार आहे. त्यामुळे दिल्लीतील सेंट्रल सेन्सॉर बोर्डावर आता विश्वास राहिला नाही.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक चित्रपटांसाठी आता इतिहास तज्ज्ञांची समिती बनवावी. ऐतिहासिक चित्रपट प्रथम या समितीला दाखवावे व नंतर ते दिल्लीला पाठवावे. याबाबतचे पत्रही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे.

चित्रपटात विकृत इतिहास

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, हरहर महादेवच्या दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला माझा विरोध नाही. मात्र, या चित्रपटात अत्यंत चुकीचा इतिहास दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळमध्ये स्त्रीयांचा बाजार भरत होता, बलात्कारी पाटील, असे या चित्रपटात दाखवले आहे. आजची नवीन पिढी पुस्तक वाचत नाही. त्यामुळे चित्रपटात जे दाखवल त्यालाच ते सत्य मानतात. अशावेळी इतिहासाची मोडतोड केलेला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर जाणे योग्य आहे का?

संभाजीराजे छत्रपती म्हणाले,मी अजूनही हर हर महादेव चित्रपट पाहिलेला नाही. मी हा चित्रपट पाहणार होतो. मात्र, अनेकांनी अत्यंत वाईट पद्धतीने हा चित्रपट बनवला गेला असल्याचे मला सांगितले.

आंदोलकांना जनावरासारखे फरफटत नेले

दरम्यान, काल मुंबईत हर हर महादेव चित्रपटाला विरोध करणाऱ्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावरही संभाजीराजे छत्रपतींनी संताप व्यक्त केला. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणा विरूध्द आंदोलन करणाऱ्या मावळ्यांना पोलिसांनी अक्षरश: जनावरासारखी फरफट करत ताब्यात घेतले. सरकारने शिवप्रेमींचा आवाज दाबण्यापेक्षा शिवद्रोह्यांना अद्दल घडवा. हर हर महादेव या वादग्रस्त चित्रपटाच्या टीव्हीवरील प्रदर्शनास स्वराज्यचे मावळे संविधानिक मार्गाने विरोध करत असताना पोलिसांनी जिजाऊ मॉंसाहेब, आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणाऱ्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत अत्यंत क्रूरतेने हे आंदोलन दडपले.

अपमान करणारे मोकाट फिरताय

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा व विकृत इतिहास दाखवणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भामटे मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर बंधने घालण्याचे व कारवाई करण्याचे धाडस कोणतेच सरकार दाखवत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संविधानिक मार्गाने लढणाऱ्या शिवभक्तांना मात्र इतकी हीन व क्रूर वागणूक दिली जाते, हा कोणता न्याय आहे ? हे कसले प्रशासन आहे?

चुकीचा इतिहास घराघरात

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, या संपूर्ण प्रकरणात सरकार केवळ अंगकाढू भूमिका घेत आहे. शिवभक्तांची भावना व विषयाची दाहकता लक्षात घेत सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करण्यास बंदी घालायला हवी होती. मात्र आज हा विकृत इतिहास घराघरात पोहोचणार आहे. अन्यथा सरकारलाही त्रास सोसावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...