आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली:महापुरातही चोरट्यांचा डल्ला; 14 घरे फोडून मुद्देमाल लंपास,  2019 च्या पुरातही झाल्या चोऱ्या

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात सांगलीत निर्माण झालेल्या महापुरातही चोरट्यांनी अनेकांच्या बंद घरात प्रवेश करत मिळेल त्या वस्तूंवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. महापूर ओसरल्यानंतर नागरिक निवारा केंद्रातून आपल्या घरी परतल्यानंतर हे चोरीचे प्रकार समोर आले असून याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी सांगली शहर ठाणे- १४, गावभाग ठाणे-१ आणि कर्नाळ ठाण्यात १ घरफोडीची नाेंद करण्यात आली असून आणखी काही घरफोड्या झाल्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारपासून पुराचे पाणी वाढू लागल्यानंतर नागरिकांनी घरातील महत्त्वाच्या वस्तू सोबत घेऊन अथवा सुरक्षित ठेवून निवारा केंद्रात, नातेवाइकांकडे स्थलांतर केले. त्यानंतर पूरस्थिती गंभीरच बनल्याने नागरिकांना बाहेरच थांबावे लागले होते. या कालावधीत चोरट्यांनी मात्र हात साफ करून घेतले आहेत. चोरट्यांनी पुराच्या कालावधीतही मिळेल ती वस्तू लांबविली. सोमवारपासून पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर नागरिक आपल्या घरी परतू लागले, तर बुधवारपासून परिस्थिती पूर्ववत होत असल्याने नागरिकांनी स्वच्छतेस सुरुवात केली. या वेळी अनेकांच्या घरात चोरी झाल्याचे प्रकार समोर आले. जुना बुधगाव रोडवरील वाल्मीकी आवास, शंभर फुटी रोड, गावभाग परिसरात हे प्रकार घडले असून त्यात लाखाे रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा संशय आहे.

२०१९ च्या पुरातही झाल्या चोऱ्या
या कालावधीत पोलिसही पूरस्थिती नियंत्रणात व नागरिकांच्या मदतीतच व्यस्त होते. त्यामुळे पोलिसांनाही पूर ओसरल्यानंतरच चोरट्यांच्या या करामती लक्षात आल्या आहेत. २०१९ च्या महापुरावेळी गावभाग अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार घडले होते. त्यामुळे या वेळी या भागातील तरुणांनी घरातील ज्येष्ठांना सुरक्षित स्थळी पाठवून स्वत: घरातच मुक्काम केला होता. अशा भागात चोरीचे प्रकार कमी घडले आहेत. दरम्यान, पुराच्या पाण्यातून येत चोरी करणाऱ्या या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

दोन दिवसांत २६०० पंचनामे पूर्ण: महापालिका क्षेत्रात पुराने बाधित झालेल्या घरे, इमारती, दुकाने यांचे पंचनामे करण्याचे काम गतीने सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण २,६०० पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये व्यापारी आस्थापनांचे ६३२ पंचनामे झाले आहेत, मात्र बाधित क्षेत्र पाहता पंचनामे लवकर पूर्ण होण्यासाठी किमान आणखी आठवडाभर लागण्याची शक्यता आहे.

पूरग्रस्त भागात वीज वसुलीला स्थगिती : राऊत
पूरग्रस्त भागातील परिस्थिती भयावह असून संपूर्ण वीज बिल माफ करणे शक्य नाही, मात्र राज्यातील पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केली. यंदाच्या महापुरात राज्यातील कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात घरे, शेती आणि महावितरणच्या उपकेंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती भयावह असली तरी संपूर्ण वीज बिल माफ करणे शक्य नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी वीज बिल वसुलीला केवळ स्थगिती देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...