आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही दोस्ती तुटायची नाय:भाजप खासदार संजय पाटील, जयंत पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास; सांगलीत राजकीय चर्चांना उत

सांगली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात भाजपचे कमळ फुलविणारे खासदार संजयकाका पाटील हे कराड विमानतळावरून राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या गाडीतून बाहेर पडले. भाजप आणि राष्ट्रवादीतील सध्याचे संबंध पाहता या दोन्ही नेत्यांमधील सलोखा आणि त्यांचा एकत्रित सफर पाहून अंदाज या सिनेमातील 'जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना', या गाण्याची आठवण सांगलीकरांना झाली. दोघांच्या एकत्रित प्रवासावरून सांगली जिल्ह्याच्या राजकारणातही आता वेगवेगळे 'अंदाज' बांधले जात आहेत.

कराड तालुक्यातील घारेवाडी येथे बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ता शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी जलसंपदा मंत्री मुंबईतील कॅबिनेट बैठक संपवून विमानाने कराडच्या विमानतळावर दाखल झाले. तत्पुर्वी सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील विमानतळावर येऊन थांबले होते. जयंत पाटील आल्यानंतर दोघांनी विमानळावरील विश्रामगृहात ब्लॅक टी घेतला आणि दोघे एका गाडीत बसून विमानतळावरून बाहेर पडले. त्यांनी कुठपर्यंत एकत्रित प्रवास केला, याची ठोस माहिती मिळू शकली नाही. मात्र, जयंत पाटील हे घारेवाडीतील नियोजित कार्यक्रमाला उपस्थित होते.

संजयकाका काँग्रेस ते भाजप व्हाया राष्ट्रवादी

युवक काँग्रेसमधून संजयकाकांनी राजकारणात प्रवेश केला. युवक काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. १९९९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून त्यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. २००४ च्या विधानसभा निवडणुकीतही अपक्ष म्हणून संजयकाकांनी आव्हान दिले. मात्र, आर. आर. आबांनीच बाजी मारली. नंतर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. राष्ट्रवादीला राम राम करून २०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना थेट खासदारकीची उमेदवारी दिली. वसंतदादा पाटलांचे नातू आणि काँग्रसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. २०१९ ला पुन्हा ते खासदार झाले.

काँग्रेसच्या मुशीत घडलेला भाजप खासदार

खासदार संजयकाका पाटील हे काँग्रेसच्या मुशीत घडले आहेत. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ते विधानसभेचे उमेदवार असा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा संजयकाकांना वरदहस्त होता. १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर आर. आर. पाटील यांचे काँग्रेसमधील कडवे विरोधक म्हणून संजयकाकांची ओळख निर्माण झाली. मात्र, त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत आर. आर. आबांचा पराभव करता आला नाही. राष्ट्रवादीने त्यांना पक्षात घेऊन विधान परिषदेवर संधी देत विरोध संपवला. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करत संजयकाकांनी संसदेत प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...