आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खानापूरच्या युवकाचा प्रेम प्रकरणातून खून!:मुलीच्या भावाने आधी समजावले, नंतर मित्राच्या साथीने परखंदीच्या माळावर काढला काटा

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम प्रकरणातून खानापूर (ता वाई) येथील वीस वर्षाच्या युवकाचा मित्राने इतर साथीदारांच्या मदतीने खून केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिषेक रमेश जाधव (वय २०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

खानापूर (ता. वाई) येथील एका मुलीचे दुसऱ्या समाजातील मुलाबरोबर मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीच्या नातेवाईकांनी व भावाने संबंधित मुलाला याबाबत समजावून सांगितले होते. मात्र, या दोघांचे प्रेम संबंधात कुठेही दुरावा आला नाही. या कारणामुळे चिडून जाऊन मुलीच्या भावाने मित्रांच्या मदतीने अभिषेक रमेश जाधव याचा परखंदीच्या माळावर खून केला.

या प्रकरणातील संशयित रहीम रसूल मुलाणी ( वय २० वर्षे रा.खानापूर ता.वाई) व त्याचे दोन मित्र पसार असून मोबाईल लोकेशनद्वारे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली. प्रेम प्रकरणातून या युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, खानापूर मध्ये तणावाचे वातावरण आहे.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर वातावरण निवळले. मात्र गावात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्यासह अधिकारी होते. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे,सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे,रमेश गर्जे,उपनिरीक्षक कृष्णराज पवार,स्नेहल सोमदे आणि वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.

आपला कामगार अभिषेक जाधव याला रहीम मुलाणी व त्याचे दोन मित्र जबरदस्तीने दुचाकीवरून घेऊन गेले असल्याची तक्रार विक्रम महदेव मोरे (रा. खानापूर) यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली होती. शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याने रात्री शेतात एक युवक जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना कळवली.

पोलिसांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशीसाठी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...