आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक साखर सहसंचालकाच्या निर्णयाने धक्का:सतेज पाटील म्हणाले - निवडणुकीत 29 उमेदवार ठेवून लढाईचे महाडिक यांच्यात धाडस नाही

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांनी सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांच्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला. यावरुन पाटील यांनी राज्य सरकार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेते धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 29 उमेदवार ठेवून लढाई करण्याचे धाडस महाडिक यांच्यात नाही असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.

ते २९ सभासद अपात्रच

श्री. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यामुळे जिल्ह्याचे राजकारण गरमा-गरम आहे. कारखान्याच्या कराराचा भंग केला असे म्हणत सतेज पाटील यांच्या राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या २९ उमेदवारांना अपात्र करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २९ मार्चला घेतला होता.

सतेज पाटील यांचे अपील

या निर्णयाविरोधात सतेज पाटील गटाने प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडे 31 मार्चला अपील दाखल केले होते. तर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांनी रविवार रात्री 12 वाजता संबंधितांना निकालाच्या प्रती पोहोचवत अपील नामंजूर केले.

उच्च न्यायालयात धाव घेणार

प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सतेज पाटील यांना निवडणुकीत दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. तर निर्णयाविरोधात सतेज पाटलांनी आता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.

महाडिक यांच्यावर टीकास्त्र

सतेज पाटील म्हणाले, सत्तेचा वापर करत अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. काल सुट्टी असतानाही प्रादेशिक सहसंचालकानी रात्री बारा वाजता निकाल दिला आहे. 29 उमेदवार ठेवून लढाई करण्याचे धाडस महाडिक यांच्यात नाही. त्यांनी 29 उमेदवारांना बाजूला केले असले तरी आता लढाई 50 जणांबरोबर आहे.

29 उमेदवारी अर्ज बाजूला ठेवून लढा

सतेज पाटील म्हणाले, महाडिक यांच्यात जिंकायचा आत्मविश्वास असेल तर 29 उमेदवारी अर्ज ठेवून लढायला हवे होते. मात्र, ते घाबरले हे कोल्हापूरकरांनीही पाहिले आहे. आज घेतलेला निर्णय राजाराम कारखान्यापूरता मर्यादित राहणार नाही. राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये लागू होईल. हा कारखाना खासगी होऊ नये यासाठी आमची लढाई सुरू आहे. या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत.