आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजश्री शाहू महाराज जयंती:कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर शाहू महाराजांच्या नावाची मोहोर; महापालिकेचे नाव लहान, जाहिरातीचे नावच मोठे

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेटकऱ्यांनी मोठी चळवळ उभारल्याने शहराचे प्रवेशद्वार झाले अखेरीस होर्डिंगमुक्त

कोल्हापूर म्हणजेच शाहूनगरी...अशी ओळख असली तरी कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर कुठेही शाहूंचे नाव अगर फोटो नव्हता. याउलट जाहिरात फलकांनी कोल्हापूरचे प्रवेशद्वार झाकोळून गेले होते. गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांनी याबाबत बोलायला सुरुवात केली आणि ही चळवळ उभा राहिली. सोशल मीडियाच्या दबावामुळे का असेना चळवळीला यश आले आणि शाहू जयंतीच्या आदल्या दिवशी कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर शाहूंचे नाव झळकले. यामुळे अवघ्या शाहूनगरीत आनंद पसरला.

शहरात प्रवेश करताना जी कमान लागते त्यावर मोठ्या जाहिरातीच्या होर्डिंगमुळे प्रवेशद्वाराचे विद्रूपीकरण झाले होते. याबाबत सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू होती. शहरातील तावडे हॉटेल येथील ज्या कमानीतून सर्वजण कोल्हापुरात प्रवेश करतात त्या कमानीवर लावण्यात आलेल्या जाहिरात होर्डिंगवरून सोशल मीडियावर टीका सुरू झाली होती. सर्वात आधी काही प्रसिद्ध इन्स्टाग्राम पेजवरून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

महापालिकेचे नाव लहान, जाहिरातीचे नावच मोठे
हळूहळू या विषयाने चळवळीचे रूप घेतले आणि बघता बघता अनेकांनी या प्रश्नांकडे लक्ष देऊन कमान जाहिरातमुक्त व्हावी अशी मागणी होऊ लागली. मात्र, अखेर नागरिकांनीच उपस्थित केलेल्या या प्रश्नाला यश आले आहे. खरं तर कमानीवर कोल्हापूर महानगरपालिका हक्क सांगते तरीही जाहिरातीचा फलक मोठा आणि कोल्हापूर महापालिकेचे नाव लहान अक्षरात होते. यावर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करत होते. त्यामुळे जाहिरातमुक्त प्रवेशद्वार आज सर्वांना पाहायला मिळाले. दरम्यान, प्रवेशद्वारावर आता शाहू महाराजांच्या नावाचा फलक लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

कमानीवरील जाहिराती काढून शिवसेनेने लावला फलक
शुक्रवारी सकाळी संबंधितांनी कमानीवरील जाहिराती काढल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर करवीरनगरीत सहर्ष स्वागत’ असा फलक लावला. दुपारी दोन वाजता त्यांनी हा फलक लावला. दरम्यान, या फलकाचे स्टेटस अपडेट करून सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...