आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा महोत्‍सव:सत्तर फूट उंच सासनकाठ्या, श्री जोतिबाचा पालखी सोहळा रंगला..

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गगनचुंबी सासनकाठ्यांची मिरवणूक... गुलाल-खोबऱ्याची उधळण अन् भाविकांच्या अमाप उत्साहात पार पडलेल्या जोतिबाच्या पालखी सोहळ्याने आज दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेचा समारोप झाला. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने राज्यभरातून भाविक डोंगरावर येत होते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांतून १० लाखांवर भाविक जोतिबाच्या डोंगरावर दाखल झाले होते. जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात. यात्रेच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने श्री मूर्तीवर महाभिषेक झाला. अलंकारपूजा बांधण्यात आली. यानंतर मानाच्या सासनकाठ्यांचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पूजन झाले. त्यांच्यासमवेत राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, शाहुवाडी - पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.

९६ सासनकाठ्या झाल्या सहभागी २० फुटांपासून ७० फुटांपर्यंत उंच सासनकाठ्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या होत्या. मिरवणुकीमध्ये पहिला मान इनाम पाडळी (जि. सातारा) या सासनकाठीचा, त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे ऊर्फ सिंधिया सरकार, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली), रेठरे बुद्रुक साळुंखे (ता. कराड) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या. याशिवाय प्रतिवर्षी येणाऱ्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या.