आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गैरवर्तन:कोल्हापूर, इचलकरंजी, अमरावतीत महिला कोरोना रुग्णांचा विनयभंग, क्वॅारंटाइन सेंटर्समधील महिला रुग्णांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

कोल्हापूर : मिनाज लाटकर​​​​​​​3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेनंतर महिला सुरक्षा रक्षकांची केली नेमणूक

पनवेलसोबतच कोल्हापूर, अमरावती, इचलकरंजी, पुणे येथील क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. क्वॅारंटाइन सेंटर्समधील महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र क्वाॅरंटाइन कक्ष असावेत या शासनाच्या आदेशांना स्थानिक प्रशासनाकडून केराची टोपली दाख‌वल्याने महिलांसाठी हे कक्ष धोकादायक ठरत असल्याचे पुढे येत आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी विभागात उभारलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात हा प्रकार घडला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आकांक्षा (नाव बदलले आहे) या अल्पवयीन मुलीसोबत क्वाॅरंटाइन सेंटरमध्येच ड्युूटीवर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याने असभ्य वर्तन केले. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने घरी फोन करून हा प्रकार सांगितला. २१ जुलै रोजीच्या घटनेनंतर राजारामपुरी पोलिस स्टेशनमध्ये कलम ३५४ ब कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

इचलकरंजीत तरुणीचा विनयभंग : इचलकरंजी येथील क्वाॅरंटाइन कक्षातील तेवीस वर्षीय निशा (नाव बदलले आहे) सोबतही असाच धक्कादायक प्रकार घडला होता. सोलापूर जिल्ह्यातील रेड झोनमधून प्रवास करून आल्याने निशासह तिच्या कुटुंबास शहरातील एका शैक्षणिक संस्थेच्या हॉस्टेलमधील क्वॅारंटाइन कक्षात ठेवण्यात आले होते. या कक्षातील स्नानगृहाला छप्पर नाही. १५ मे रोजी आरोपीने स्नानगृहाच्या भिंतीवर चढून तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर या ठिकाणी एकच खळबळ उडाली. तणावही निर्माण झाला. पीडितेच्या तक्रारीनंतर गावभाग पोलिस स्टेशनमध्ये कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीस अटक, गुन्ह्याची चार्जशीट दाखल
तक्रारीवरून ३५४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितालाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची चार्जशीटही दाखल झाली आहे. घटना घडली तेव्हा बराच गोंधळ झाला होता, पण पोलिस उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली. - गजेंद्र लोहार, पोलिस निरीक्षक, इचलकरंजी

घटनेनंतर महिला सुरक्षा रक्षकांची केली नेमणूक
संस्थात्मक विलगीकरणात कुटुंबीयांना एकत्र ठेवण्याची व्यवस्था आहे, तरीही महिला आणि पुरुषांना स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना आहेत. महिला कक्षांसाठी महिला कर्मचारी आणि महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करीत आहोत. तसेच, विलगीकरण कक्षांमधील स्वच्छतागृहांची तपासणीच्या सूचना दिल्या आहेत. - मल्लीनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महापालिका

तपास सुरू, चार्जशीट बाकी : मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केलीय. मुलगी ही अल्पवयीन असल्यामुळे ३५४ ब या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला ताब्यात घेतले असून आम्ही तपास करतोय. अजून चार्जशीट दाखल झाली नाहीये. -भगवान शिंदे, एपीआय (राजारामपुरी), कोल्हापूर