आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार संजय राऊत यांच्या टीकेला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळेच मंत्री झालो. आजही तेच आमचे वंदनीय आहेत. त्यांचे विचार समोर ठेवूनच आमची वाटचाल सुरू आहे. आमच्या मनात आणि दालनात बाळासाहेब ठाकरे यांची छबी कायम असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
ठाकरेंनी राऊतांना सुरक्षित अंतरावर ठेवावे
संजय राऊत यांच्या नादाला लागल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना सोडून आमदार निघून गेले आहेत. उरलेले लोक जवळ ठेवायचे असतील तर ठाकरेंनी राऊतांना सुरक्षित अंतरावर ठेवावे. तरच उरलेले त्यांच्यासोबत राहतील, असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
केंद्राने राऊतांच्या वक्तव्याची दखल घ्यावी
शंभूराज देसाई म्हणाले की, संजय राऊत हे न्यायपालिका खिशात घातली, असा आरोप करीत आहेत. खरंच याबाबत त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे. उगाच वाचाळ बडबड करू नये. केंद्र सरकारने त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे.
सातारकरांना हे कसे काय चालते?
छत्रपती उदयनराजे भोसले यांना दोन वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचे वारसदार असल्याचे पुरावे मागणारे संजय राऊत साताऱ्यात येऊन राजघराण्यावर टीका करतात, हे सातारकरांना कसे काय चालते? असा सवाल करून शंभूराज देसाई म्हणाले, सातारकरांनी त्यांना जिल्ह्यातच येऊ दिले नाही पाहिजे.
आमच्यामुळेच संजय राऊत खासदार
शंभूराज देसाई म्हणाले, मला आव्हान देणारे संजय राऊत आम्ही मतदान केले म्हणून खासदार आहेत. त्यांनी अगोदर खासदारकीचा राजीनामा देऊन ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे. मगच जनतेतून निवडून आलेल्या माझ्यासारख्या लोकांना आव्हान द्यावे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
नुकत्याच सातारा येथे झालेल्या जाहीर सभेत संजय राऊतांनी मंत्री शंभुराज देसाईंवर जोरदार हल्ला केला होता. राऊत म्हणाले होते, अनेक लोक शिवसेना सोडून गेले. पण शिवसेनेची बस कधी रिकामी राहिली नाही. आपली बस नेहमी भरलेली असते. पुढून 50 उतरले तर मागून 100 चढतात. काय ते पाटणचं पापाचं पित्तर कोण ते? शंभु की चंबू ? अरे शिवसेना नसती तर तुझ्या घराण्याला मंत्रीपद मिळाले असते का? 37 वर्षानंतर तुम्हाला मंत्रीपद मिळाले. तुमच्या घराण्याला मिळाले, असे म्हणत संजय राऊतांनी शंभूराज देसारईंवर टीका केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.