आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी केली रोबोटची निर्मिती, ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून कौतुक

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे संशोधक डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी ‘युव्ही-360 सॅनिटायझर मॉड्युल’वर आधारित ‘तारा’ हा रोबोट निर्माण केला आहे.

महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी रोबोटची निर्मिती करणे, ही अभिमानाची बाब आहे, असे कौतुकोद्गार महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे संशोधक डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी ‘युव्ही-360 सॅनिटायझर मॉड्युल’वर आधारित ‘तारा’ हा रोबोट निर्माण केला आहे. त्या रोबोटचे ई-अनावरण आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले.

राऊत म्हणाले, कोरोनाच्या महामारीत दिलासा देणाऱ्या अशा अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधनाची देशालाच नव्हे, तर जगाला मोठ्या प्रमाणात गरज आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, माझ्या कारकीर्दीत शिवाजी विद्यापीठाकडून रोबोटिक तंत्रज्ञानाधारित संशोधन होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. जगाच्या बरोबरीने भारत आणि महाराष्ट्र वाटचाल करतो आहे, याचे हे द्योतक आहे.

उद्योग संचालनालयाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, युव्ही व रोबोटिक तंत्रज्ञानाचा संगम करून त्याचा वापर निर्जंतुकीकरणासाठी करण्याचा प्रकल्प महत्त्वाचा आणि स्वप्नवत आहे. तो प्रत्यक्षात आणल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे व तेथील संशोधक टीम अभिनंदनास पात्र आहे. यावेळी सदर प्रकल्पाविषयी माहिती देताना डॉ. राजेंद्र सोनकवडे म्हणाले, कोरोनाच्या काळात आपल्या घरातील, कार्यालयातील स्पर्श झालेल्या, वावर असलेल्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करणे हा एकमेव उपाय आहे. त्यासाठीच युव्ही-३६० सॅनिटायझर मोड्युल रोबोटची निर्मिती केली आहे. डॉ. सोनकवडे पुढे म्हणाले, रोबोटमध्ये वापरलेल्या लिथियम आयन बॅटरीमुळे चार तास चार्ज केल्यानंतर तो दोन ते अडीच तास कार्यरत राहू शकतो. हा रोबोट अँड्रॉइड ऍपच्या मदतीने कोठूनही चालवणे शक्य आहे. मोबाइल वाय-फायद्वारे काही मीटर अंतरावरून हाताळला जाऊ शकतो. याही पुढे तो इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाद्वारे परदेशातूनही चालवता येतो. त्याची कार्यस्थिती समजण्यासाठी त्यावर LED बसवले आहेत.

यावेळी नागपूर येथून युट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीसचे संचालक रत्नदीप कांबळे, पवन खोब्रागडे, समीर रामटेके यांनी सदर रोबोटची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी स्वागत केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

रोबोटची प्रमुख वैशिष्ट्ये...

  • यात विविध सेन्सर्स वापरलेले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI-Artificial Intelligence) तंत्रज्ञान. मानवी हालचाली अचूक ओळखून अतिनील किरणांचे उत्सर्जन तत्काळ थांबवण्यासाठी यामध्ये पी.आय.आर. सेन्सर वापरला आहे. खोलीत फिरताना अडथळ्यांमुळे खराब होऊ नये यासाठी अँटीकॉलिजन सेन्सर वापरला आहे.
  • निर्जंतुकीकरणाच्या ठिकाणाचे मोजमाप घेण्यासाठी एल.आय.डी.ए.आर. (LIDAR) सेन्सर बसवला आहे. त्यामुळे रोबोट ३६० अंश स्कॅनरच्या साहाय्याने द्विमिती किंवा त्रिमितीमध्ये मोजमाप घेऊन त्यानुसार निर्जंतुकीकरणासाठीची वेळ निर्धारित करतो.
  • प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त सिम्युलेशन्स अँन्सिस सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि कॅडफेम या कंपन्यांनी पुरवली आहेत.
  • २० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची क्षमता १० बाय १० मापाची खोली ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत निर्जंतुक करण्याची आहे. यात वापरलेल्या ११ वॅटच्या एकूण १८ UV-C टयूबमुळे कोरोना विषाणूसोबतच इतर विषाणू व जीवाणूंचाही नायनाट करणे शक्य होणार आहे.
  • कोविड-१९ वॉर्ड, मोठमोठे माॕल, रुग्णवाहिका, हॉटेल्स, उपहारगृहे, सार्वजनिक वाहने, खासगी हॉटेल्स, विमानतळ, प्रवासी कक्ष, रेल्वे, रेल्वेमधील स्वयंपाक कक्ष, धान्य कोठी, घर, कार्यालये, व्यायामशाळा, महाविद्यालये, कारखाने, किरणा दुकान, सिनेमागृह, बँक, सार्वजनिक शौचालये इ. ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी हा रोबोट अत्यंत लाभदायक आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्यासोबत बोलूही शकतो. कोरोना व इतर विषाणू, सूक्ष्मजीव, विकिरणे, विद्युतचुंबकीय लहरी, अतिनील किरणे अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर माहिती देऊ शकतो.