आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र विशेष:पिंक बॉल कसोटी सामन्यातील पहिली भारतीय शतकवीर

सांगली / गणेश जोशी5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कठीण कार्यही तपस्या आणि साधनेच्या जोरावर सिद्धीस नेण्याची शक्ती असलेल्या सिद्धीयात्रीचा आजचा दिवस. क्रिकेटसारख्या पुरुषप्रधान खेळात आपल्या कर्तृत्वाचा चौकार लावणारं नाव म्हणजे सांगलीची स्मृती मानधना. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या पिंक बॉल टेस्टमध्ये पहिल्या डावातच स्मृतीने तडाखेबाज शतक झळकावले. पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

स्मृतीनं १७० चेंडूंत कसोटी कारकीर्दीतील पहिलं व गुलाबी चेंडूच्या कसोटीतही पहिलं शतक झळकावलंय. स्मृतीच्या झंझावाती खेळामुळे तिच्यावर क्रीडाविश्वातून कौतुकाचा वर्षाव होतोय. शिवाय स्मृतीनं विराट कोहलीशी बरोबरी केल्याचंही बोललं जातंय. कारण विराटनंही बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावलं होतं.

स्मृृती मानधनाचा जन्म १८ जुलै १९८६ रोजी मुंबईत झाला. वर्षभरात तिचे वडील श्रीनिवास व आई स्मिता हे सांगलीत स्थायिक झाले. श्रवणच्या क्रिकेट कारकीर्दीसाठी मैदानावर जात असायचे. याच वेळी मीसुद्धा येणार म्हणून सकाळच्या वेळी तीच अगोदर वडिलांच्या स्कूटरवर जाऊन बसत होती. दहावीपर्यंत स्मृतीने कुपवाडच्या कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये क्रिकेटचे धडे गिरवले. दहावीत ८६ टक्के गुण पटकावत तिने क्रिकेटचे वेडही जोपासले. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या संघातही स्थान पटकावले. वयाच्या ११व्या वर्षी तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चौफेर विकास करण्यासाठी क्रिकेटकरिता वेळही खूप दिला.

खेळातील प्रगती पाहून प्रशिक्षकांनी तिला क्रिकेटमध्येच करिअर करण्याचे सूचवले. त्या वेळी तिला खरं तर लॉन टेनिसमध्ये अधिक रस होता, परंतु फलंदाजी व गोलंदाजीतील कामगिरी पाहून प्रभावित क्रिकेटतज्ज्ञांनी तिची शिफारस राज्यपातळीवर केली. तिला क्रिकेटमध्ये संधी मिळाली आणि भारतीय क्रिकेटमध्ये तिने आपले स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर म्हणून तिची ओळख आहे.

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये तिने इंग्लंडमध्ये २०१४ मध्ये आपली कारकीर्द सुरू केली आणि ती दिग्गज खेळाडू बनली. वयाच्या विसाव्या वर्षी स्मृतीने जागतिक पातळीवरील क्रिकेट क्षेत्राचे लक्ष वेधले असले तरी वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने सांगलीच्या कृष्णाकाठच्या कसदार मातीत आपल्या खेळाचे वेड जोपासले. तिचे प्रशिक्षक अनंत तांबवेकर सांगतात की, मितभाषी स्मृती खेळाकडेच जास्त लक्ष केंद्रित करत होती. त्यामुळे तिचा मैत्रिणींचा गोतावळाही कमी आहे. ती दिवसभर नुसता क्रिकेटचाच विचार करते. जगतेही क्रिकेटच. तिची जिद्द आणि आवड यामुळेच तिचे सरावात सातत्य राहिले. एकदा सांगितलेली क्लृप्ती जमेपर्यंत ती माघार घेत नाही अथवा सरावातील सातत्य थांबवत नाही, हेच तिच्या यशाचे गमक म्हणावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...