आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोवळ्या हाती तुणतुणं येता येता वाचलं:बापाने विकलेला 'तो' मुलगा बालकल्याण संकुलात सुरक्षित

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • मुलाचा बाप, तृतीय पंथी आणि नोटरी दस्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा जिल्हा बाल संरक्षण समितीचा आदेश

त्याचे वय अवघे दहा वर्षे... आईच्या पदराला धरुन हट्ट करण्याच्या या वयात मात्र त्या मुलाच्या नशिबी भलतंच जग आलं होतं... वडील व्यसनी आणि आई अंथरुणावर खिळलेली आजारी... त्यामुळे वडिलांकडून आधी आजोळी, नंतर पुन्हा वडिलांकडे आणि अचानक तृतीय पंथीयाच्या तुकडीत त्याची रवानगी झाली... मग त्या कोवळ्या जीवाची चांगलीच फरफट सुरू झाली...अखेर या सर्वांतून त्याची सुटका झाली... अन् गोंडस मुलाच्या हाती तुणतुणं येता येता वाचलं... जिल्हा बाल संरक्षण समितीच्या निर्णयाने सर्वसामान्य मुलगा तृतीयपंथी होण्यापासून वाचला.

सध्या तो मुलगा बालकल्याण संकुलात आनंदात आहे. त्या कोवळ्या हातात तुणतुण्या ऐवजी बालकल्याण संकुलातील सवंगड्यांचे हात आले आहेत. तो हसू लागला आहे. खेळू लागला आहे. इतकेच नाही तर... यापुढे संकुलातच राहण्याची तयारीही त्याने दाखवली आहे.

कोरोना महामारीच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे भासवून व्यसनी बापाने आपल्या दहा वर्षे वयाच्या मुलाला तृतीय पंथीयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. या प्रकरणाची जिल्हा बाल संरक्षण समितीच्या वतीने पूर्ण चौकशी करण्यात आली. लाॅकडाऊन काळात केवळ नोटरी करुन केलेली दत्तक प्रक्रिया अवैध ठरविण्यात आली. तसेच संबंधित प्रकरणात मुलाचे वडिल दिगंबर उर्फ उत्तम जोतिराम पाटील, तृतीय पंथी गजेंद्र गुंडाळे, नोटरीद्वारे दत्तक प्रक्रीया करून देणारी व्यक्ती तसेच मुलाच्या आईच्या तब्येतीबाबत खोटे सर्टिफिकेट देणारे डॉक्टर या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मुलाला बालकल्याण संकुलात सुरक्षित ठेवण्यात आले आहे असे जिल्हा बाल संरक्षण समितीच्या सदस्या अॅड दिलशाद मुजावर यांनी सांगितले.

असे आले बनावट दत्तक प्रकरण उजेडात

संबंधित दहा वर्षाच्या मुलाची आजी माणगांव येथे चार घरची कामे करुन उदरनिर्वाह करते. तिची विवाहीत मुलगी आजारी असल्याने नवर्याने तिला कायमचे माहेरी धाडले आणि आजीवर मुलीसह तिच्या दोन मुलांचीही जबाबदारी आली. पण दोन मुलांपैकी एकाची तरी वडिलांनी जबाबदारी घेतली तर मुलांविषयी प्रेम निर्माण होईल. मुलीचा संसार मार्गी लागेल या आशेने आजीने मोठ्या मुलाला वडिलांकडे ठेवले. महिन्यातून एकदा तरी आजी नातवाला पहायला यायची. लाॅकडाऊन दरम्यान मे महिन्यांपासून फोन केले तरी मुलगा घरी नाही. आत्याकडे गेला आहे यासह इतर कारणे आजीला संबंधित मुलाचे वडील देत होते. मात्र लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर आजीने पहिल्यांदा जावयाचे घर गाठले. पण तिचा नातू म्हणजेच तो मुलगा तिला तेथे भेटला नाही. त्यामुळे आजी अस्वस्थ झाली. तिची अस्वस्थता तिने कामावर बोलून दाखवली. त्या मालकांनी आजींची मदत करीत कोल्हापूरातील एका कार्यकर्त्याची भेट घालून दिली. पण शहरातील पोलिस ठाण्यात आजीची कोण दाद घेईनात. अखेर त्या कार्यकर्त्यांने आजीला शहर पोलिस उप-अधिक्षक प्रेरणा कट्टे यांच्याकडे पाठवले. त्यानंतर या प्रकरणाला गती आली, अन् मुलांची तृतीय पंथीयांच्या तुकडीतून सुटका झाली.

पैसेही आणि अंधश्रद्धाही

मुलाच्या विक्री प्रकरणाला वेगळेच वळण असल्याचे समितीच्या चौकशीत उघड झाले. मुलाची आत्या या गजेंद्र गुंडाळे यांच्या संपर्कात होती. देवाच्या नावे दारोदारी फिरून मागून खाणार्या गुंडाळे यांच्या सोबत आणखी काहीजण राहतात. सगळे मागून खातात. पती आजारी असल्याने हतबल झालेली मुलाची आत्या असेच भविष्य विचारता विचारता त्यांच्या संपर्कात आली होती. वडिल वृध्द, आई आजारी आणि भाऊ व्यसनी असल्याने मुलांचे खाण्याचे वांदे होत होते म्हणून दोन वेळ खाईल आणि यांच्याकडे सुखरुप राहील या विचाराने मुलाला गजेंद्र गुंडाळे यांच्या स्वाधीन केल्याचे तिने समितीसमोर सांगितले.

पण मागून खाणारे त्या मुलाला काय भविष्य देणार? भावाचे मुल तुम्ही का नाही सांभाळले? तृतीय पंथीयांना का दिले अशा अनेक प्रश्नांवर ती निरुत्तर झाली. या प्रकरणात आर्थिक देवाण-घेवाण झाली नाही असे सांगितले जाते. पण संबंधित तृतीयपंथी मुलाला दत्तक घेतल्या नंतर धार्मिक विधी आणि जेवणावळीसाठी आमचे पाच लाख रुपये खर्च झाले आहेत ते द्या..नाहीतर मुलाला द्या अशी मागणी करीत होते.

मारहाण केली अन् कोंडूनही घातले...

मुलाने जबाब देताना तृतीय पंथीयांनी माझ्या हातून नकळत ग्लास फुटला म्हणून डोक्यात टप घालून मारल्याचे सांगितले. तसेच अनेकदा किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आल्याचेही त्यांने सांगितले. ते बाहेर जाताना मला घरात कोंडून जात होते असेही मुलाने समिती समोर सांगितले. गजेंद्र गुंडाळे यांचे वय सुमारे ५५ आहे. उतारवयात सांभाळ कोण करणार...त्याच्या या कामाचा उत्तराधिकारी म्हणून मुलाला दत्तक घेतल्याचे बोलले जात होते. आज नाही पण काही वर्षांनी मुलाच्या हाती तुनतुन येण्याची दाट शक्यता होती.

बातम्या आणखी आहेत...