आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणका:शिवभक्तांच्या उग्र आंदोलनापुढे बेळगाव प्रशासन नमले, सात दिवसांत शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवणार

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटक सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Divya Marathi
कर्नाटक सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
  • शिवभक्तांनी ठिय्या आंदोलन करुन कर्नाटक प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले

बेळगाव जिल्ह्यात मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कर्नाटक प्रशासनाने हटवल्याचे संतप्त पडसाद रविवारी गावात उमटले. शिवभक्तांनी ठिय्या आंदोलन करुन कर्नाटक प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले. येत्या सात दिवसांच्या आत महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवला जाईल, असे आश्वासन बेळगाव जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

जिल्हा प्रशासनाने मनगुत्ती (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हलवल्याने शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. रविवारी सकाळपासून परिसरातील शिवभक्त गावात जमले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबर्गी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांनी बैठक घेतली. शिवभक्तांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत तत्काळ शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवण्याची आग्रही मागणी केली. मनगुत्ती गावात रविवारीही तणावाचे वातावरण होते. ग्रामस्थांनी नियोजित शिवस्मारक जागेवर ठिय्या मांडला. शनिवारी सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना पत्र लिहून शिवभक्तांच्या भावना कळवून नियोजित जागी शिवरायांचा पुतळा त्वरीत बसवावा असे सांगितले. पत्राची दखल घेत मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुख यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून हे प्रकरण विना वादंग मिटवण्याचे आदेश दिले होते. रविवारी सकाळी पोलिस फौजफाट्यासह स्वत: जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबर्गी, हुक्केरीचे तहसीलदारांनी मणगुत्ती गावात हजेरी लावली होती. संपूर्ण प्रकरणावर तीन गावचे पंच, ग्रामस्थ यांची बाजू ऐकल्यानंतर प्रशासनाने ग्रामस्थांकडे सात दिवसांची मुदत मागितली आहे. ग्रामस्थांनीही प्रशासनाला सात दिवसांत कारवाई करण्यास मुदत दिली आहे.

मनगुत्ती ग्रामपंचायतीचा ठराव असूनसुद्धा रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे कृत्य कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांप्रति असलेला द्वेष पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. कर्नाटकविरोधात सीमाभागासह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. रविवारी दुपारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवर कर्नाटक सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.

बातम्या आणखी आहेत...