आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकेच्या नियमन कायदा १९४९ च्या कलम २२ (४) अन्वये कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला. याबाबतचे आदेश आरबीआयचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी गुरुवारी दिले. ठेवीदारांच्या हिताला बाधा येण्याचा धोका असल्याने आणि बँकिंग नियमाचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र, ठेवीदारांनी हवालदिल होऊ नये. ठेवी परत करण्याइतपत बँकेची आर्थिक तरलता असल्याचेही या आदेशात स्पष्ट केले आहे.
२०१९-२० च्या आर्थिक वर्षात बँक दोन तिमाहींसाठी किमान निव्वळ किंमत नियम (मिनिमम नेटवर्थ) पाळू शकली नाही, या कारणांमुळे परवाना रद्द केल्याचे आरबीआयने आदेशात म्हटले आहे. यापुढे बँक नियमन कायदा ५ (ब) नुसार बँकेला कसलेही व्यवहार करता येणार नाहीत.व्यावसायिक कारणांसाठी २४ ऑगस्ट १९९६ रोजी आरबीआयने राज्यात लोकल एरिया बँकांच्या स्थापनेस परवानगी दिली होती. पाच कोटी रुपयांचे भागभांडवल उभे करून खासगी, कार्पोरेट, ट्रस्ट, सोसायटी आदींना लोकल एरिया बँक सुरू करण्याचा परवाना देण्याचे धोरण होते. या बँकांना भौगोलिक सलगता असलेल्या जिल्ह्यात शाखा विस्तार करण्याची परवानगीही देण्यात आली होती.
कोल्हापुरात १० जुलै २००३ रोजी सुभद्रा लोकल एरिया बँकेला परवाना मिळाला होता. सुरुवातीला बँक कोल्हापूर जिल्हा मर्यादित होती. नंतर शाखा विस्तारल्या, बँकेचे मुख्य कार्यालय कोल्हापुरात असून सातारा, सांगली, बेळगाव आणि पुणे जिल्ह्यात लोकल एरिया बँक म्हणून काम करण्यासाठी आरबीआयकडून बँकिंग परवाना होता. बँकेच्या कोल्हापुरात सुरुवातीला तीन शाखा कार्यरत होत्या. मात्र गेल्या काही वर्षापासून एकच शाखा कार्यरत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.