आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनसाइड स्टोरी:गाव सोडण्यासाठी गावकरी जमले; बोलता-बोलता डाेंगराने पोटात घेतले, तळियेतील आपबीती सांगायला कुणीच जिवंत राहिले नाही

मुंबई / अशोक अडसूळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाड ते भोर या रायगड व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरच्या वरंधा घाटाच्या कुशीत वसलेल्या तळिये मधलीवाडी गुरुवारी दरडीखाली गडप झाली. दुर्दैव म्हणजे दुर्घटनेचा मागमूस येताच गावकरी वाडी सोडण्याच्या चर्चेसाठी जमले असतानाच भली मोठी दरड कोसळली अन् वाडीतली सर्वच्या सर्व ३५ कुटुंबे काळाच्या उदरात क्षणात गाडली गेली. दरम्यान, डोंबिवलीचे नातेवाईक १२ तासांत मदतीसाठी पोहाेचले तर प्रशासन मात्र २४ तासांनी पोहाेचले.

रायगड जिल्ह्यात १०३ दरडग्रस्त गावे असून तळिये मधलीवाडी त्यापैकी एक होते. गेले पाच दिवस घाटमाथ्यावर तुफान पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता दरडीच्या धोक्याचा अंदाज गावकऱ्यांना आला होता. वाडी सोडायची काय, यावर चर्चा करण्यासाठी गावकरी जमले. बायामाणसांनी आवराआवर करून चार-पाच दिवस वाडी सोडण्याची तयारी केली होती. इतक्यात एका बाजूचा ७० फुटांचा डाेंगर घसरला, त्यापाठोपाठ राडारोडा, वृक्ष अन् मोठा पाण्याचा प्रवाह या एकत्र जमलेल्या गावकऱ्यांच्या घोळक्यात शिरला. कुणाला काही कळायच्या आत ८५ जीव गाडले गेले.

दरड कोसळल्याची खबर लगेच शेजारच्या गावाला लागली. पाऊस तुफान होता, त्यामुळे लोक मदतीला येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी वाडीतल्या नातेवाइकांना फोनाफोनी केली. ठाणे, डोंबिवलीत असलेल्या वाडीतल्या नातेवाइकांना फोन गेले. वाडीत कुणाचा फोन लागत नव्हता. मग, मुंबईकर नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाला कळवले. मध्यरात्रीच ठाणे, डोंबिवलीतील नातेवाईक तळियेला यायला मार्गस्थही झाले.

रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे हेलिकाॅप्टरची सायंकाळी मागणी केली. मात्र रात्री हेलिकाॅप्टरचे आॅपरेशन करण्यास अनुमती नाही, असे कारण देण्यात आले. मग, एक पोलिस पथक महाडहून पाठवले. त्या पथकाने ७ किमी चालत जाऊन दुर्घटनेची माहिती घेतली. पहाटे ३ वाजता महाडहून आमदार भरत गोगावले यांनी जेसीबी आणला अन् वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यातला राडोराडा काढण्यास प्रारंभ केला. सकाळी पाऊस कमी झाल्यावर तळियेच्या गावकऱ्यांनी वाडीकडे धाव घेतली. त्यांना एक महिला जिवंत सापडली. सकाळी ठाणे, मुंबईतील वाडीतल्यांचे नातेवाईक पोहोचले. आजूबाजूच्या गावातले नातेवाईकही आले. तरी अवघ्या १४ किमी असलेल्या महाडहून महसूल प्रशासन पोहोचले नव्हते की एनडीआरएफची टीमही पोहोचली नव्हती. दुपारी १२ च्या सुमारास मदत पथके पोहोचली आणि शोधकार्याला सुरुवात झाली.

दोन घरांचा चौथारा तेवढा शिल्लक : मधलीवाडीत ३२ घरे होती, पैकी केवळ दोन घरांचा चौथारा तेवढा शिल्लक हाेता. बाकी तेथे गाव होते याचा मागमूसही शिल्लक नव्हता. मात्र वाडितले मंदिर तेवढे जसेच्या तसे निर्विकारपणे उभे होते. शुक्रवारी दिवसभार नातेवाइकांची रडारड सुरू होती. कोणी आई, वडील तर कोणी मामा, मामीचा शोधा घेत होते. ज्या गावात ते जन्मले, वाढले, ती वाडी, ते घर, ती माणसे क्षणात गडप झाल्याचे पाहून त्यांना शब्दही फुटत नव्हता.

१० ते १२ बालके ढिगाऱ्याखाली
तळिये गावातल्या बालवाडीत मधलीवाडीतली १० बालके होती. तर बिरवाडीच्या हायस्कूलमध्ये वाडीतले १२ विद्यार्थी शिकत होते. ते सर्वच्या सर्व दरडीखाली सापडल्याचे तळिये प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने सांगितले. अनिता पोळ या विवाहितेचा शेजारच्या गावात राहणारा भाऊ सकाळी आला होता. मेहुणा, बहीण अन् भाचा यांचा तो शोध घेत होता.

बातम्या आणखी आहेत...