आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाईन ऊस परिषद होणार:कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर येथे होणारी 19 वी ऊस परिषद ऑनलाईन घेण्याचा संघटनेचा निर्णय

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

येत्या 2 नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद आयोजित करण्यात आली होती. पण, जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक रित्या परिषद न घेता ऑनलाईन घेण्यासाठी परवानगी दिल्याने जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर होणारी ऊस परिषद प्रथमच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस परिषदेला मान्यता मिळावी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना 'स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालंधर पाटील यांनी विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन येथे ऑनलाइन पद्धतीने ऊस परिषद होईल असे सांगितले.

दरवर्षी ऊस हंगामाला सुरुवात होण्याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होते. परिषदेत स्वाभिमानी संघटना ऊस दर जाहीर करते. यंदा संघटनेने, 2 नोव्हेंबर रोजी विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान यंदाच्या ऊस परिषदेवर कोरोनाचे सावट होते.'स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष प्रा. पाटील म्हणाले, 'ऊस परिषदेला परवानगी मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटलो तेव्हा जिल्हाधिकारी म्हणाले, शंभर वर्षाची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरच्या शाही दसरा मेळावा व मुंबईतील शिवसेनेचा मेळावा ऑनलाइन पद्धतीने झाला. तुम्ही सामाजिक हिताचेच काम करताय. त्या सामाजिक हिताला बाधा येऊ नये म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही ऊस परिषद ऑनलाइन पद्धतीने घ्यावे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन आणि सामाजिक हित या अनुषंगाने 'स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असा निर्णय घेतला आहे की, जयसिंगपूर येथील 19 वी ऊस परिषद होणारच. मात्र विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन मध्ये व्हर्च्युअल ऑनलाइन पद्धतीने ही ऊस परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यमांनी ही व्हर्च्युअल ऑनलाइन ऊस परिषद शेतक-यांपर्यंत पोहचवून संघटनेला सहकार्य करावे.' असे आवाहन करण्यात आले आहे.