आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर!:कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर, नागरिकांचे स्थलांतर; पंचगंगेसह इतर नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

कोल्हापूर3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राधानगरी धरण 99% भरले, 2800 क्युसेक विसर्ग
  • राज्यात सरासरीच्या 101.7% पाऊस; धरणे 52% भरली

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह इतर नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. शहराला धोक्याचा इशारा देणारा रेडेडोह फुटला आहे. २३ गावांसह कोल्हापूर शहरातील ५ ते ६ हजार नागरिकांचे स्थलांतर केले आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. पाऊस तसेच धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण ९९ टक्के भरले आहे. धरणाचे २ दरवाजे उघडले असून २८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ९ राज्यमार्ग व २५ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ३४ मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

राज्यात सरासरीच्या १०१.७% पाऊस; धरणे ५२% भरली

कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार, राज्यात आजवर ६०४.१ मिमी म्हणजेच सरासरीच्या १०१.७% पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील १८९ तालुक्यांत सरासरीच्या १००% वा त्याहून जास्त तर ९३ तालुक्यांत ७५ ते १००% पाऊस बरसला. राज्यातील धरणांत ४६.६४% पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी हा साठा ५२.२९% इतका होता.

331 मिमी पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेत गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत झाली. सांताक्रुझ येथे १६२.३ मिमी पाऊस नाेंदवण्यात आला. कुलाबा येथे बुधवारी वाऱ्याचा वेग ताशी १०६ किमी होता.

राज्यभरात एनडीआरएफची १६ पथके केली तैनात

राज्यात एनडीआरएफची १६ पथके तैनात असून ४ पथके कोल्हापुरात आहेत. पुण्यासह प. महाराष्ट्रातही जोरदार पाऊस सुरू असून धरणांतील साठा वाढत आहे. मुंबई, कोकण, कोल्हापुरातील स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आढावा घेत आहेत.

मंत्रालय परिसर तुंबला, पवारही चकित

मुंबईत मंत्रालयासमोरही तुंबलेले पाणी पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही चकित झाले. मंत्रालयासमोर एवढं पाणी आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. कारमध्ये शरद पवारांसोबत गेलेल्या सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पेजवरून पावसाचे लाइव्ह सुरू केले. मंत्रालयासमोर प्रचंड पाणी साचले होते. मुंबईत अविश्वसनीय पाऊस पडलाय. मंत्रालयासमोर समुद्रासारखेच वाटत आहे, असे त्या म्हणाल्या. त्यावर पवारांनीही मंत्रालयासमोरील पूरपरिस्थितीवर आश्चर्य व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...