आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील धारावीत कोरोना आटोक्यात आला. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सरकारचे कौतुक केले होते. परंतु, आरएसएसच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात आला. येथील कोरोना नियंत्रणाचे श्रेय सरकारने घेण्याची गरज नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना आटोक्यात का नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे आले
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, "धारावीत कोरोनाचा कहर माजला होता. कोरोनामुळे माणसे मरत होती, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून काम करत आहेत, असं एकही वृत्त वाचनात किंवा पाहण्यात आले नाही. मात्र धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली असे डब्लूएचओने सांगितले त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले."
...तर स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्तीचे काम करावे
शेट्टी म्हणाले की, "आरएसएसचे मुख्यालय असलेल्या नागपुरातही कोरोनाचा कहर आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही याबाबत मला माहिती नाही. कारण मी कोल्हापूरच्या बाहेर पडलो नाही. इचलकरंजीसह अनेक शहरात कोरोनाचा हाहाकार आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी तिथे जावे, जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्तीचे काम करावे, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल."
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
धारावीत झालेल्या कोरोना नियंत्रणाचे सगळं श्रेय सरकारने घेण्याची गरज नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रीनिंग केल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावीची दखल
“धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले”, असा कौतुकाचा वर्षाव जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी केला आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला होता. दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. पण येथील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.