आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या 'वडणगे पॅटर्न'ला आज प्रत्यक्षात सुरुवात

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या वडणगे पॅटर्नला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. वडणगे ग्रामपंचातीच्या माध्यमातून या रुग्णाला किट देवून मनोबल वाढवून त्याच्याच घरी स्वतंत्रपणे गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. वडणगे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत अशा पध्दतीने उपचारासाठी मागणी केली होती. याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक पाठवून मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

गावातील एका कॉलनीत राहणाऱ्या या पेशंटला कोरोनाची बाधा झाल्यावर त्याला कोव्हिड काळजी केंद्रात पाठविले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून या रुग्णाला लक्षणे नसल्याने त्यास गृह विलगीकरणात ठेवता येईल असे सांगितले. या रुग्णाच्या घरी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, असे पत्र ग्रामपंचायतीने कोव्हिड काळजी केंद्राला दिल्यानंतर रुग्णाला घरी राहण्याची परवानगी देण्यात आली.

रुग्णाचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामपंचायत, दक्षता समिती सदस्य यांनी रुग्णाच्या कॉलनीत जाऊन रुग्णाशी आणि नातेवाईकांशी घराबाहेरून संवाद साधला. घराच्या वरील मजल्यावर स्वतंत्र खोलीमध्ये रुग्ण राहणार आहे. तसेच कुटूंबातील दोन सदस्य खालील खोलीमध्ये रहाणार आहेत. रुग्णांने कोणती काळजी घ्यावी, सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत शासनाने दिलेली नियमावली त्यांना देण्यात आली.

वडणगे गावाने केलेल्या संकल्पाला आजपासून प्रारंभ केला आहे. ग्राम दक्षता समिती त्याचबरोबर ग्रामस्थ यांचे मोठे सहकार्य लाभले. डॉ. अभिजित गाडिवड्ड हे या रुग्णाची काळजी घेणार असून येणाऱ्या काळात हा उपक्रम यशस्वी करु असे सरपंच सचिन चौगले यांनी सांगितले.

सरपंच सचिन चौगले यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे ग्रामपंचायतीमार्फत किट दिले. यामध्ये ऑक्सिमीटर, थर्मोमीटर,औषधे, ड्रायफ्रूट , पनीर , आयुर्वेदिक काढा साहित्य, वाफ घेण्यासाठी निलगिरी तेल याचा समावेश आहे .डॉ.संदिप पाटील यांनी तयार केलेले रुग्णाच्या बाबतीतील दिवसभराचे वेळापत्रक देण्यात आले. यात आहारतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली केलेला डायट प्लॅन, योगा,ध्यान,हलका व्यायाम तसेच वाफ घेण्याचा, आयुर्वेदिक काढा घेण्याच्या वेळा याचा समावेश आहे. - ग्रामपंचायतीमार्फत आवश्यक वस्तुंचे किट

- कोरोना रुग्णास दिवसभराचे वेळापत्रक तयार केले

- घरातील इतर सदस्यांसाठीही नियमावली

- डाएट प्लॅन ही केला तयार