आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:गाडी चोरी प्रकरणात जामीन मिळवून देणाऱ्या वकिलाचीच दुचाकी पळवली

सातारा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांची किडनी निकामी झाल्याचा बहाणा केल्याने वकिलाने नेले दुचाकीवर

सातारा जिल्ह्यातील उंब्रज ( ता. कराड) येथील पोलिस ठाण्यासमोरूनच दुचाकी चोरणाऱ्या एका युवकाला उंब्रज पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने त्याची बुधवारी मुक्तता केली होती. मात्र, त्याला जामीन मिळवून देणाऱ्या वकिलालाच मारहाण करून त्यांचीच दुचाकी पळवून नेण्याचा प्रकार बुधवारी रात्री सातारा शहरात उघडकीस आला. विनोद पोपट कांबळे (२५ , रा. चंदननगर, एमआयडीसी, सातारा) या युवकाला उंब्रजमध्ये पोलिस ठाण्यासमोरून दुचाकी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कराड येथील न्यायालयासमोर उभे केले. मात्र, त्याचा जामीन अर्ज मांडण्यासाठी वकील मिळत नसल्याने कराड येथील वकील हरीश प्रवीणकुमार शहा यांनी विनोद कांबळे याची न्यायालयात बाजू मांडून त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळवून दिला होता. 

जामीन मिळाल्यानंतर विनोद याने शहा यांना माझ्या वडिलांची किडनी निकामी झाली आहे, ते शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे मला साताऱ्याला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमची गाडी मला द्या, मी उद्या तुम्हाला परत आणून देईन, अशी गळ घातली. परंतु गाडीचोराला गाडी कशी द्यायची? यामुळे त्यांनी विनोद कांबळे यास गाडी देण्यास नकार दिला. मात्र, विनोदने जास्त गयावया करून हंबरडा फोडल्याने शहा यांना त्याची दया आली. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील वाहतूक बंद आहे. त्यामुळे शहा यांनी त्यांच्या गाडीवरून त्याला साताऱ्याला सोडण्याचा निर्णय घेतला.

साताऱ्यात गेल्यानंतर वकिलाला मारहाण करून दुचाकी लंपास, आरोपीविरोधात पुन्हा दाखल

दोघेही कराडहून साताऱ्याला येण्यास निघाले. मजल-दरमजल करीत सुमारे दीड तासानंतर दि. २४ रोजी रात्री उशिरा सातारा येथील एमआयडीसी परिसरातील चंदन नगर येथे पोहोचले. पोहोचताच चंदन नगर येथील एका उंच इमारतीकडे बोट दाखवून हेच माझे घर आहे, असे विनोदने सांगितल्यानंतर शहा यांनी गाडी थांबवली. गाडी थांबताच शहा बेसावध असल्याचा फायदा घेत विनोदने त्यांना मारहाण करत त्यांची गाडी हिसकावून घेतली व घटनास्थळावरून पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेने शहा घाबरले. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस स्टेशन गाठत विनोद कांबळे विरोधात जबरदस्ती गाडी चोरून नेल्याची तक्रार केली. यानुसार सातारा पोलिसांनी विनोद कांबळे विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...