आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘छत्रपती शिवाजी महाराजांना अडवण्यासाठी बापलेकात भांडणे लावण्यात आली होती,’ असे सूचक वक्तव्य करत संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला सोमवारी रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात टोला लगावला. प्रस्थापित स्वराज्याला सुरुंग लावणार हे त्या वेळीच शिवाजी महाराजांना कळले होते, असे म्हणत सध्याच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, शहाजीराजांना सांगण्यात आले होते की, मुलाला घरातच थांबवा, नाही तर आमच्यात सामील करून घ्या, असे म्हणत त्यांनी शिवसेना प्रवेशाच्या मुद्द्याला अप्रत्यक्ष हात घातला. शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेक बादशाह्या होत्या. कुतुबशाही, मोगलशाही, आदिलशाही या सर्वांना लक्षात आले होते की, शिवाजी महाराज हे वेगळे रूप आहे. हे काही तरी वेगळे घडवणार आहेत. आताच शिवाजी महाराजांना रोखायला हवे, असे त्या वेळच्या आदिलशाही आणि मोगलशाहीला वाटले. या वेळी त्यांनी ठरवले की बापलेकात भांडण लावायचे. त्या वेळी शहाजीराजेंवर खूप दबाव टाकला, कारण शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करणार होते. स्वराज्य स्थापन करणाऱ्यांच्या घरातही फूट पाडायची, असा टोला त्यांनी राज्यसभा निवडणुकीवरून लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही. त्यामुळे शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सज्ज होऊ. सरकारने शिवभक्तांच्या सोयी-सुविधांसाठी काहीही केलेले नाही, अशी टीकाही त्यांनी या वेळी बोलताना केली.
यंदा रायगडावर गर्दीचा उच्चांक
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. ढगाळ वातावरणात शिवभक्तांच्या गर्दीने फुललेल्या रायगडावर राजसदरेवर युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवराई सुवर्ण नाण्यांच्या प्रतिकृतींचा अभिषेक करत शिवछत्रपतींच्या जयघोषाने गर्दीचा उच्चांक गाठत शिवराज्याभिषेक सोहळा अविस्मरणीय ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.