आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीराजेंना सोमवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतेवेळी मंदिर संस्थानने देऊळ कवायतच्या नियमांचा दाखला देत गर्भगृहात जाण्यापासून रोखले होते. याच्या निषेधार्थ गुरुवारी (१२ मे) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच कुंकू, चुरमुरे आदी प्रासादिक भांडारासह हाॅटेल्स, शहरातील सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तर पुजारी बांधवांनी बंदमध्ये सहभागी होत भाविकांच्या पूजा, विधी करणे टाळल्याने भाविकांची गैरसोय झाली. छत्रपती संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्या मंंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार व धार्मिक व्यवस्थापकांना निलंबित करण्याच्या मागणीवर सर्वपक्षीय नेते ठाम आहेत.
गुरुवारी शहरातील सर्व भागांतील दुकाने बंद ठेवत व्यावसायिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार व धार्मिक व्यवस्थापकांना निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. निवेदनावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, प्रशांत सोंजी, अर्जुन साळुंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त सौदागर तांदळे यांनी मंदिर कार्यालयात बैठक घेतली. बैठकीत आंदोलक छत्रपती संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्या मंंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार व धार्मिक व्यवस्थापकांना निलंबित करण्याच्या मागणीवर ठाम होते. तसेच यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
धार्मिक पूजा विधी बंद बंदमध्ये तिन्ही पुजारी मंडळे सहभागी झाली होती. गुरुवारी दिवसभर पुजाऱ्यांनी मंदिरात भाविकांच्या धार्मिक पूजा विधी करणे टाळले. यामुळे भाविकांना केवळ दर्शनावर समाधान मानावे लागले.
गैरसोय होऊ नये म्हणून भाविकांना केळी, बिस्किटांचे वाटप बंदमध्ये शहरातील सर्वच व्यावसायिक सहभागी झाल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे जार ठेवण्यात आले होते. याशिवाय भाविकांना अल्पोपाहार, केळी, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. शहरात विविध भागांत पिण्याच्या पाण्यासह अल्पोपाहार उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांची सोय झाली.
नवदांपत्यांना विधी, पूजा न करताच परतावे लागले
बंदमध्ये शहरातील सर्वच भागांतील व्यावसायिकांनी सहभाग नोंदवल्याने शहरात दिवसभरात चहासुद्धा मिळू शकला नाही. बंदमध्ये महाद्वार परिसरातील व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच सहभाग नोंदवला. पूजेच्या साहित्यासह हाॅटेल, उपाहारगृहे बंद असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला. वावर जत्रेसाठी आलेल्या अनेक नवदांपत्यांना विधी, पूजा न करता केवळ दर्शन घेऊन परतावे लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.