आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुठ मुठ घुगऱ्या घ्या आमच्या शुभ्रसेनेला खेळायला न्या....अशा बारशाच्या ओळी घरात नाही तर कोविड सेंटरमध्ये गुंजत होत्या. सजलेला पाळणा, फुलांच्या माळा, तोरण, रांगोळी, रंगबिरंगी फुगे सगळं अगदी घरच्या सारखं.... विशेष म्हणजे कोविड सेंटर मधून उपचार घेऊन घरी गेलेल्या आत्या, मावशांनीही बारशाला हजेरी लावली होती.
आई पाॅझिटीव्ह आल्याने बाळाच्या जन्मावेळी अनंत अडचणी आल्या. बाळाचा जन्म दवाखान्यात झाला पण संगोपन मात्र कोविड सेंटरमध्ये झाले. जन्मताच आईसह कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या छोट्या परीचे आज तिथेच मोठ्या थाटामाटात बारसे झाले. कोरोनाच्या विळख्यात आलेल्या माहेर वाशिण ओल्या बाळंतिणीला आणि नवजात बाळाला कोल्हापूरच्या व्हाईट आर्मी मूळे जीवदान मिळाले. आज ही बाळंतीण आपल्या १२ दिवसांच्या नवजात कन्येसह बारसे उरकुनच आपल्या आईच्या घरी गेली.कोरोनाला हरवून घरी परतणाऱ्या या आपल्या मुलीला जीवदान मिळाल्याने घरची मंडळी हरखून गेली.
प्रयाग चिखली येथील मुलीला लग्न लावून मुंबईला दिली.संसार सुखाचा सुरू झाला.गरोदरपणात बाळंतपणासाठी तिला माहेरी यायचे होते.ती तीन महिन्यांपूर्वी प्रयाग चिखलीमध्ये माहेरला आली.एका नामांकित प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरकडे तिच्यावर गरोदरपणात उपचार सुरू होते.दिवस भरले आणि तीन सप्टेंबर रोजी तिच्या पोटात दुखू लागले.म्हणून दवाखान्यात नेले.पण स्वॅब घेतल्याशिवाय तिला दाखल करून घेण्यासाठी डॉक्टर तयार झाले नाहीत.अशातच तिचा स्वॅब दिला आणि तो पॉझिटिव्ह आला.हे ऐकून 'त्या'डॉक्टर ने या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घ्यायला नकार दिला.घरच्या लोकांची तारांबळ उडाली.पण जवळच्याच एका डॉक्टरांनी आपल्या पेशाला शोभेल असे निर्णय घेऊन तिला आपल्या दवाखान्यात दाखल करून घेतले.प्रसव वेदना असह्य झाल्या,पण डॉक्टरांनी सिझेरियन करून बाळाचा आणि मातेचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला.आणि मध्यरात्री 1वाजण्याच्या सुमारास या मातेने एका गोंडस कन्या रत्नाला जन्म दिला...या मातेचे नाव अमृता सचिन गुरव.
असह्य प्रसव पीडा सहन केल्या नंतर आणि बाळाच्या जन्मानंतर मातेचे पुनर्जन्म होते असे म्हणतात.पण ही माता कोरोना ग्रस्त झाली.आणि माहेरच्या लोकांची काळजी वाढली.अमृताला कोरोनाच्या उपचारासाठी आता कोणत्या दवाखान्यात ठेवायचे या चिंतेने ग्रासले..पण अमृताच्या मामांनी तात्काळ अशोक रोकडे यांच्याशी संपर्क साधला आणि अडचण सांगितली .व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता या मातेला तात्काळ व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करायला सांगितले..मध्यरात्री 2 वाजता आपल्या नवजात कन्येसह अमृता गुरव कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाली.बाळाची काळजी घ्यायला तिची जाणकार आजी सुद्धा याच कोविड सेंटरमध्ये राहिली..अमृताला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आबाजी शिर्के आणि त्यांचे सहायक डॉ.अमोल कोडोलीकर या दोघांच्या देखरेखीखाली तब्बल बारा दिवस उपचार करण्यात आले.या काळात व्हाईट आर्मीच्या नर्स हिना यादवाड यांनी तर दिवसरात्र एक करून काळजी घेतली.तिची मनापासून सुश्रूषा केली.सोबतीला व्हाईट आर्मीचे कोरोना योद्धे जवान होतेच..
आता 13 दिवसांनी अमृताच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि त्या पूर्णपणे निगेटिव्ह आल्या आहेत.त्यामुळे अमृता आपल्या नवजात कन्येसह माहेरी गेली आहे. सासरच्या आणि माहेरच्या मंडळीने व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे आणि त्यांच्या सर्व मेहनती जवानांचे तसेच मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर आणि विशेष करून तिच्यावर उपचार करणारे डॉ.आबाजी शिर्के यांचे मनापासून आभार व्यक्त केलेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.