आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अपहरण:झटपट पैसे मिळविण्यासाठी अल्पवयीन मुलांनी केले एकाचे अपहरण , पकडले जाण्याचा भीतीने मुलाला सोडून दिले

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूरातील दोन अल्पवयीन मुलांनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने मुलाच्या अपहरणाचा कट रचला. पाच लाख रुपये मिळवायचे आणि चौघात वाटायचेही ठरले. चौघांनी आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण केले; पण भीतीने पुन्हा त्या मुलाला सोडून दिले. येथील लक्ष्मीपुरी पोलिसांनी या अपहरणाचा उलगडा करत दोघांना बेड्या ठोकल्या. दिशाभुल करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी हिंदीतून संभाषण करून मुलाच्या वडिलांना तेरा छोकरा मेरे पास है अशी फिल्मी स्टाईल धमकी दिली होती. निव्वळ चंगळवादासाठी केलेल्या या अपहरणातून तरुण पिढी कुठे वाहवत चालली आहे हे समोर आले.

समरजित गोरख घोरपडे (वय 19), अक्षय बळवंत चौगले (19, दोघे रा. बाचणी, ता. करवीर) अशी संशयितांची नावे आहेत; तर अन्य दोन साथीदार अल्पवयीन आहेत. दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. लक्षतीर्थ वसाहत येथील हॉटेल व्यावसायिकाच्या आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याची कल्पना याच परिसरातील एका अल्पवयीन संशयिताच्या डोक्यात आली. त्याने आपल्या कटात समरजित घोरपडेला आणि समरजितने गावातील अक्षय चौगलेला सामिल करून कट रचला. सोमवारी सायंकाळी दोघांनी मोटारसायकलवरून 8 वर्षीय मुलाला पळवले. मुलांच्या वडिलांकडून पाच लाखांची मागणी केली. दरम्यान ज्या भागात अपहरणकर्ते मुलाला घेऊन फिरत होते तेथूनच मुलाचे वडीलही येताना दिसताच आपला प्लॅन फसल्याची कल्पना त्यांना आली. पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी मुलाला रात्री घराजवळ सोडून पोबारा केला.

पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी गुन्हा दाखल करून तपास डीबी पथकाच्या उपनिरीक्षक सुजाता शेळके यांच्याकडे दिला. पथकातील रोहित मदनि यांनी घटनास्थळी जाऊन माहिती मिळविली अपहरणकर्त्यांनी हिंदीतून संभाषण केल्याने सुरुवातीला परप्रांतीय गुन्हेगार असावेत, असे वाटले होते. पण पोलिसांनी अपहृत मुलाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे याच परिसरात वावरणारा समरजित व अक्षय यांची नावे निष्पन्न झाली. या दोघांनीही गुन्ह्यांची कबुली दिली. तपास पथकामध्ये कॉन्स्टेबल नामदेव पाटील, तानाजी गुरव, योगेश शिंदे यांचा सहभाग होता.

मास्टर माईंडला दोन लाख

अपहरणानंतर मिळणाऱ्या पैशातील कोणी किती रुपये घ्यायचे याचाही प्लॅन करण्यात आला होता. लक्षतीर्थमध्येच राहणारा एक अल्पवयीन संशयित या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याने स्वत:ला दोन लाख, तर इतरांना एक-एक लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखविल्याचे पोलिसांनी सांगितले.