आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट टळले:मंत्री उदय सामंत, संभाजीराजेंच्या स्पीड बोटीचा अपघात टळला; दोघेही सुखरूप, माध्यमांना स्वतः दिली माहिती

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या स्पीड बोटीचा अपघात थोडक्यात टळला. मुंबईहून अलिबागकडे येतानाच्या प्रवासात ही घटना घडली. मात्र, दोघेही सुखरूप आहेत. त्यांनी स्वतःच पत्रकारांना ही माहिती दिली. स्पीड बोटीच्या चालकाचे नियंत्रण सुटले होते. त्यामुळे ही बोट भरकटली होती. मात्र, वेळीच बोट नियंत्रणात आली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

उदय सामंत यांची बोट यापूर्वीही भर समुद्रात बंद पडली होती. त्यामुळे दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने ते किनाऱ्यावर पोहचले होते. आता दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे.

नेमके झाले काय?

उद्योग मंत्री उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री आहेत. त्यांची रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीची बैठक होती. या बैठकीला संभाजीराजे छत्रपतीही उपस्थित होते. बैठकीसाठी दोघेडी स्पीड बोटीने रायगडला निघाले होते. मात्र, ही बोट मांडवा जेट्टीजवळ आली. त्यावेळी बोटीचा वेग वाढला. त्यामुळे चालकाचे काही काळासाठी बोटीवरील नियंत्रण सुटले.

काळ आला होता, पण...

बोट जेट्टीच्या दोन खांबांना घासली. त्यामुळे साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पुढे मांडवा जेटीवर आमदार महेंद्र दळवी स्वागतासाठी उभे होते. त्यांनीही मंत्र्यांची स्पीड बोट भरकटल्याचे पाहिले. मात्र, चालकाने वेळीच या बोटीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे अपघात होता-होता राहिला. आता दोघेही सुखरूप आहेत, अशी माहिती त्यांनी स्वतः पत्रकारांना दिली.

पूर्वीही अशीच घटना

जानेवारी महिन्यात उदय सामंत अलिबाग ते मुंबई असा स्पीड बोटीने प्रवास करत होते. त्यावेळीही अशीच दुर्घटना घडली. या प्रवासात सामंत यांच्या बोटीचे इंजिन बंद पडले. समुद्राच्या लाटांमुळे बोट भरकटली. स्पीड बोटीच्या सर्वच यंत्रणा बंद पडल्या. त्यामुळे बोटीच्या कॅप्टनला तात्काळ 'एसओएस' हा आपत्कालीन संदेश सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवणेही कठीण झाले. या कठीण समयी सामंत यांच्या स्वीय सहाय्यकाने मोबाइलवर संपर्क साधत दुसरी बोट घटनास्थळी मागवली. अन् संकट टळले.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

उदय सामंत यांच्याबद्दल स्पीड बोटीचा अपघात होण्याची घटना दोन वेळेस टळली गेली. त्यामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, आता यापुढे स्थानिक आमदारांनासोबत घेऊनच स्पीड बोटीने प्रवास करण्याचे ठरवले आहे, असे सामंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता-होता असाच टळला होता.