आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंंची टीका:काय तर म्हणे मी खंडणी मागतोय; उदयनराजेंचे उपमुख्यमंत्र्यांना आव्हान

सातारा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर सडकून टीका केली. ‘माझ्याबाबत कोण काय बाेलले मला माहीत नाही, पण माझ्यावर खाेट्या केसेस करून मला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, सत्ता आहे तोपर्यंतच, त्यानंतर... कायॽ एवढेच असेल तर ईडीच्या चाैकशीस दोघेही सामाेरे जाऊ,’ असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

सातारा जिल्ह्यातील मलवडी येथे गेल्या आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना जिल्ह्यातील माण, खटाव आणि सातारा तालुक्यात खंडणीखाेरांचे प्रमाण वाढले आहे, असे माझ्या कानावर सातत्याने येत आहे. अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करा, अशी सूचना एसपींना केल्याचे सांगितले हाेते.

साताऱ्याच्या एमआयडीसीमधील खंडणीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात कुणाचाही विशेष उल्लेख न करता समाचार घेतला हाेता. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार यांनी “साताऱ्याच्या एमआयडीसीतील खंडणीखोर कोण तुम्हाला माहीत नाही काॽ कधी तरी खरे बाेलायला शिका,’ अशी टिप्पणी केली हाेती. उपमुख्यमंत्र्यांचा राेख खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हाेता. परंतु त्यांनी त्यांचा नामाेल्लेख टाळला हाेता.

आज माध्यम प्रतिनिधींनी उदयनराजे भोसले यांना सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात याबाबत छेडले. उदयनराजे म्हणाले की, माझा लढा हा भ्रष्टाचाऱ्यांशी आहे. कोणत्या पक्षासाेबत अथवा वैयक्तिक कुणाशी माझा लढा नाही. मी खंडणी मागतो, असे जे कोणी म्हणत असेल त्यांनी समाेर यावे. माध्यमांच्या समाेर यावे. इतकीच जर हिंमत असेल, तर चला ईडी, सीबीआयच्या चाैकशीला सामाेरे जाऊया. आहे का तुमच्यात दम? उगीच फालतू दाेन लाखांची खंडणी मागितल्याचा आराेप करणे ही काय पद्धत झाली का?

बातम्या आणखी आहेत...