आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
उदयनराजेंनी यासंदर्भात शिंदे-फडणवीसांशी पत्रव्यवहार केला असून आणखीही काही मागण्या केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना करताना रयतेचा सहभाग महत्त्वाचा मानला. त्यातूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया रचला. प्रत्येक जातीधर्माचा आदर केला. त्याच छत्रपतींचा आणि राष्ट्र उभारणीत सर्वस्व पणाला लावलेल्या राष्ट्रपुरुषांचा सातत्याने अवमान होत आहे. राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा करावा, असे उदयनराजेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असणाऱ्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा आणावा, अशी आमची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सातत्याने अवमानकारक वक्तव्ये झाली आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आपल्याला केवळ प्रतिक्रियावादी व्हावे लागत आहे. त्यामुळे कायदा करणे ही काळाची गरज आहे. त्याबाबत कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करुन तयार केलेला कच्चा मसूदाही पत्रासोबत जोडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावा. अधिकृत इतिहास जगासमोर येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडावा. तो इतिहास खंड रूपात प्रकाशित करावा. नवी दिल्लीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित परदेशातील विविध संग्रहालयात असणारी महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू, चित्रे भारतात आणण्यासाठी वेगाने पावले टाकावी. छत्रपतींच्या जीवनावर तसेच ऐतिहासिक प्रसंगावर आधारित कलाकृर्तीच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला मदत करणारी तज्ज्ञांची समिती नेमावी. प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना करावी, अशा मागण्या उदयनराजेंनी पत्रात केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.