आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यामुळे हीच आपली दैवत असून त्यांचे विचार समाजात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
छगन भुजबळ यांच्या हस्ते आज खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील सावता माळी समाज मंदिर बाजारपेठ येथे महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार मकरंद पाटील, अध्यक्ष विशाल राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, माजी सभापती राजेंद्र तांबे, नितीन भरगुडे पाटील, शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, हजारो वर्ष बहुजन समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होता. तत्कालीन व्यवस्थेकडून त्यांच्यावर अनेक अन्याय व अत्याचार झाले. महिलांना कुठलेही स्वातंत्र्य नव्हते. अगदी ब्राह्मण समाजातील महिलांना देखील कुठलेही स्वातंत्र्य नव्हते. त्या काळात महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. त्यांना समाजात महत्वाचे स्थान निर्माण करून दिले. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांचे हेच कार्य पुढे छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी पुढे नेले. त्यामुळे आज महिलांना समाजात महत्त्वाच स्थान मिळालं आहे. त्यामुळे हीच आपली खरी दैवत असून त्यांच्या विचार समाजात रुजविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच या महापुरुषांचे पूजन नियमित होण्यासाठी या महापुरुषांचे पुतळे उभे करा. त्याची नियमित पूजा करा हेच स्मारके व पुतळे समाजातील प्रत्येक घटकाला कायम प्रेरणा देत राहतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना छगन भूजबळांनी अभिवादन केले. व्यवस्थेच्या अंधकारात अडकलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन समाजाच्या मुख्य समाजात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या साथीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. सर्व समाजातील महिलांना शिक्षणाचे कवाड खुल करून दिलं. त्यामुळे चूल आणि मूल या चार भिंतींच्या आत अडकलेल्या महिलांना समाजात सर्व स्तरांत मुक्तपणे संचार करणे शक्य झालं. त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत आहे. त्यांनी केलेलं हे कार्य चिरकाल स्मरणात राहील. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करतो असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.