आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोल्हापूर महापौरपदासाठी झाली होती राजकीय सौदेबाजी, 10 वर्षांपूर्वी 20 नगरसेवकांना दिले प्रत्येकी 35 लाख

सांगली / गणेश जोशीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी दिली खळबळजनक कबुली

कोल्हापूरच्या गटा-तटाच्या राजकारणात महापौरपदाच्या शर्यतीत जनसुराज्य पक्षाच्या नगरसेवकाची महापौरपदावर वर्णी लागण्यासाठी तब्बल २० नगरसेवकांना प्रत्येकी ३५ लाख रुपये दिले गेले. त्यामुळे सामान्य लाेकांचा आपणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, अशी कबुली १० वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरेंनी दिली.

कोल्हापूरच्या राजकारणात गटा-तटाचे राजकारण सातत्याने बदलत असते. एकेकाळी हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांची आघाडी होती. तर माधवराव महाडिक व गृहराज्यमंत्री सतेज पाटील एकत्र होते. या दोन आघाड्यांत लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य व जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये मोठी अटीतटीची लढत होत होती. सध्या माधवराव महाडिक, विनय कोरे एकत्र आले आहेत, तर विरोधात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ आहेत. हसन मुश्रीफ आणि विनय कोरे एकत्र असताना कोल्हापूर महापालिकेवर जनसुराज्यचा महापौर पदाच्या उमेदवार सई खराडे यांच्या समर्थनार्थ विरोधी आघाडीतील सुमारे २० नगरसेवकांना आपलेसे करण्यासाठी विनय कोरे यांनी प्रत्येक नगरसेवकाला ३५ लाख रुपये दिले आणि कोल्हापूर पालिकेवर प्रथमच जनसुराज्यचा झेंडा फडकवला होता, अशी कबुलीच कोरे यांनी या वेळी दिली.

कोल्हापुरात सहकाराचे मोठे जाळे : कोल्हापूर जिल्ह्यात वारणा सहकारी उद्योगाचे मोठे जाळे आहे. साखर कारखाना, वारणा उद्योग समूह, दूध संघ, विविध प्रक्रिया, सोसायट्या, कॉलेजेस या माध्यमातून गेली २० वर्षे विनय कोरे राजकारणात सक्रिय आहेत. कोल्हापूर महापौर पदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ३५ लाख रुपयांचे वाटप झाले. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये विनय कोरे हे अपारंपरिक खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्यांना कोल्हापूर महापालिका ताब्यात ठेवणे महत्त्वाचे वाटत होते.

ईडीमार्फत चौकशी करा; संविधान कृतीची मागणी
कोरेंच्या कुबलीनंतर संविधान कृती समितीचे अध्यक्ष पारस ओसवाल यांनी प्रकरणाची आयकर आणि ईडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींना खरेदी करण्यासाठी १० वर्षांपूर्वी कोरे यांनी सात कोटी रुपये खर्च केले. हा पैसा त्यांनी कोठून जमवला आणि लोकशाहीचा एकप्रकारे गळाच घोटला आहे. त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारने कसून चौकशी करावी, असेही ते म्हणाले. दरम्यान, कोरे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.

बातम्या आणखी आहेत...