आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निधन:सुप्रसिद्ध पैलवान सादिक पंजाबी काळाच्या पडद्याआड, कोल्हापूरमधील शाहू विजयी गंगावेस तालमीत गिरवले कुस्तीचे धडे

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • सादिक पंजाबी यांच्या निधनाने कुस्तीपंढरी हळहळली

नामवंत पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी यांचे लाहोर शहरात निधन झाले. पाकिस्तानच्या या मल्लाने मात्र कुस्तीपंढरी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे कुस्तीचे धडे गिरवले. त्यांच्या जाण्याने कुस्तीपंढरीतील त्यांच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. धिप्पाड गोरापान आणि देखना मल्ल आखाड्यात कुस्ती खेळताना पहायला १९६० च्या काळात कोल्हापूरत गर्दी व्हायची.

कोल्हापूरमधील शाहू विजयी गंगावेस तालमीत १९६० ते १९६३, तर त्यानंतर मठ तालमीत त्यांची जडणघडण झाली. भारतातून पाकिस्तानात परतल्यावर लाहोरमध्ये आखाड्यात ते पैलवानांना माती व मॅटवरील कुस्तीचे धडे देत होते. हिंदकेसरी मारुती माने यांचे ते मित्र होते. हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्याशी त्यांचा तालमीत असताना नेहमी संपर्क असायचा. आयुष्यात एकदा पुन्हा कोल्हापुरात येऊन रंकाळ्यावर फिरायचे आहे, अशी इच्छा होती. त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. त्यांचा मुलगा सज्जन पंजाबी हा पैलवान असून, तोही पैलवानांना मार्गदर्शन करतो. भारतात तसेच कोल्हापुरात त्यांना खुप प्रेम मिळाले. त्यांच्या अनेक लढती गाजल्या. त्यांच्या अचानक जाण्याने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

कुस्तीला शाहु महाराजांनी दिला राजाश्रय

सादिक पंजाबी यांचे वडील निका पंजाबी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत कोल्हापूर कुस्ती लढतींसाठी येत होते. तालमीत डावपेचांचे प्रशिक्षणही घेत होते. मुलगा सादिक यांनाही त्यांनी कुस्तीची गोडी लावली. सादिक पंजाबी यांनी इथल्या तालमीत अंग झिजवून कुस्तीचे डावपेच आत्मसात केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्याविषयी त्यांच्या मनात आदर होता. कोल्हापुरात कुस्तीला मिळालेल्या राजाश्रयाचे त्यांना कौतुक होते. त्यांच्या खासबाग मैदान लढती मात्र जुन्या पिढीच्या स्मरणात राहिल्या.

तालमींची शतकी परंपरा लाभलेले कोल्हापूर

श्री शाहू विजयी गंगावेस तालमीची स्थापना 1920 ची म्हणजेच तालमीचे हे शतकमहोत्सवी वर्ष. कुस्ती आणि मर्दानी खेळाबरोबरच तालमीचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान राहिले. ब्रिटिशांच्या विरोधात क्रांतिसिह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पत्री सरकारने उभारलेल्या सशस्त्र संघर्षाचे उपकेंद्र म्हणूनही तालमीला मोठी परंपरा आहे. या चळवळीचे नेते वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई आदींसह क्रांतिकारक मंडळी भूमिगत असताना त्यांचा मुक्काम तालमीत असायचा. स्वातंत्र्यसैनिक अण्णाप्पा पाडळकर यांनी तीस वर्षांहून अधिक काळ तालमीची जबाबदारी नेटाने सांभाळली. आजही तालमीत मल्ल कुस्तीचे धडे गिरवतात.

शाहूकालीन मल्लांच्या यादीत स्थानिक मल्लांसोबत पाकिस्तानच्या मल्लांचा समावेश होता. ज्ञानोबा यादव, गणपत ससे, नारायण यादव आणि त्यानंतरच्या काळात बापू यादव, अण्णाप्पा पाडळकर, रायगोंडा पाटील, सदबा भास्कर,आंबेवाडी अतितकर पैलवान, नेमचंद लबाजे, भैरू वास्कर, साधू कोराणे, बाबूराव बचाटे, राजाराम वास्कर, राम चव्हाण आदी मल्लांनी तालमीचे नाव आणखी उंचावले. सादिक पंजाबी, बाला रफीक या पाकिस्तानी मल्लांनी येथे सराव केला. अलीकडच्या काळात गणपत खेडकर (डबल महाराष्ट्र केसरी), हिंद केसरी दीनानाथ सिंह, महाराष्ट्र केसरी अप्पा कदम, संभाजी पाटील-आसगावकर, रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे ही सर्व मंडळी याच तालमीत तयार झाली.