आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खद:बीड, सोलापूरसह साताऱ्यात शॉक लागून 10 जणांचा मृत्यू ; फुले तोडण्यासाठी गेलेले तिघे ठार

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शनिवारी बीडमध्ये ५, साताऱ्यात ४ आणि सोलापुरात १ अशा १० जणांचा शनिवारी शॉक लागून मृत्यू झाला. शेतात फुले तोडण्यासाठी गेलेल्या तिघांचा शॉक लागल्यानंतर विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तासवडे (ता. कराड) गावात शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत दीर, भावजयीसह एका मुलाचा मृत्यू झाला आहे. हिंदुराव मारुती शिंदे (५८), सीमा सदाशिव शिंदे (४८) आणि शुभम सदाशिव शिंदे (२३) अशी मृतांची नावे असून दोघे बचावले.

ता. कराड येथील शिंदे वस्तीत राहणारे हिंदुराव मारुती शिंदे, त्यांची भावजय सीमा सदाशिव शिंदे आणि पुतण्या शुभम सदाशिव शिंदे हे सायंकाळी विहिरीजवळच्या शेतात फुले तोडण्यासाठी गेले होते. त्या वेळी मोटरच्या तुटलेल्या वायरचा शॉक लागल्याने तिघे विहिरीत फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, मारुती शिंदे, त्यांची भावजय सीमा सदाशिव शिंदे आणि पुतण्या शुभम सदाशिव शिंदे यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, टेंभुर्णी येथेही एकाचा शॉक लागून मृत्यू झाला.

कराड : आरतीवेळी शॉक लागून मुलीचा मृत्यू
गणपतीच्या आरतीवेळी शॉक लागून ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील सवादे-नाईकवाडी गावात घडली आहे. अर्पिता प्रकाश शेवाळे (८) असे मृत मुलीचे नाव आहे. सवादे (ता. कराड) गावच्या बसथांब्याजवळ नाईकवाडी नावाची मोठी वस्ती आहे. तेथील सिद्धनाथ मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सायंकाळी गणपतीची आरती सुरू असताना वायरला स्पर्श होताच अर्पिताला जबर शॉक लागला. शॉक लागल्यानंतर अर्पिताला तातडीने रुणालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला.

विजेच्या तारेला चिकटून दोन चिमुकल्यांसह आई जागीच ठार
घराच्या शेजारी पडलेल्या तारेला चिकटून दोन लेकरांसह आईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यावर शनिवारी दुपारी बारा वाजता घडली. गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला या घडलेल्या घटनेमुळे शोककळा पसरली होती.

गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी
तांडा येथील महिला ललिता श्रीकांत राठोड(३०) त्यांचा मुलगा अभिजित श्रीकांत राठोड (८) आणि प्रशांत श्रीकांत राठोड (११) अशा तिघांचा राहत्या घराजवळील विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी तत्काळ भेंडटाकळी तांड्यावर जाऊन राठोड परिवाराचे सांत्वन केले. याप्रकरणी सायंकाळपर्यंत तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, बीड तालुक्यातील चौसाळा येथे गिझरचा शॉक बसून तारेक अजीज कुरेशी या तरुणाचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत नळाचे पाणी भरताना पाण्याच्या मोटारचा शॉक लागून प्राजक्ता किशन गायकवाड (१८) या तरुणीचा अंबाजोगाईत मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...