आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटीगाठीचे सत्र सुरूच:सिंह-वाझे यांच्या भेटीनंतर आता अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट, मुंबई पोलिस करणार चौकशी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे चांदिवाल कमिशनसमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले. त्यांनी बऱ्याच वेळ चर्चा देखील केली असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझेत भेट झाल्याची माहिती मिळत आहे. वाझे आणि देशमुख या दोघांमध्ये सुमारे दहा मिनीटे चर्चा झाली असून, या दोघांनी बंद दाराआड काय चर्चा केली हे अस्पष्ट आहे.

अनिल देशमुख आणि सचिन वाझे चांदीवाल आयोगाच्या कार्यालयाबाहेर एकाच खोलीत जवळपास 10 मिनिटे चर्चा करत होते. एकाच प्रकरणात चौकशीच्या फेरीत अडकलेल्या परमबीर सिंह, अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यातील भेटीगाठींच्या सत्रामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

सोमवारी परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे चांदीवाल आयोगाकडे जात असताना त्यांच्यात देखील चर्चा झाली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंह आणि वाझेंच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, "हे अत्यंत चुकीचे आहे. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली याची चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्तांना सांगण्यात आले आहे." असे प्रतिक्रिया गृहमंत्री वळसे पाटील यांनी माध्यमांना दिली आहे.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची चौकशी आता मुंबई पोलिस करणार आहे. मुंबई पोलिस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना भेटीसाठी अधिकृत परवानगी होती की, नाही? जर अशी अधिकृत परवानगी नसेल तर या दोघांची भेट कशी झाली? याचा तपास मुंबई पोलिस करणार आहेत. तसेच यासंदर्भात सचिन वाझेंना चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यासाठी घेऊन येणाऱ्या पथकाचीही चौकशी केली जाणार आहे.

पोलिसांवर दबाव आहे का?

पत्रकारांनी वळसे पाटील यांना पोलिसांवर दबाव आणल्या जात आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, "तसा काही प्रश्न उद्भवत नाही. दबाव असण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टातून संरक्षण घेतले असल्याने ज्या पोलिस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत तिथे जबाब देत आहेत". राज्य सरकार हे सीबीआय चौकशीला सहकार्य करत असल्याचे वळसे पाटील म्हणाले. परमबीर सिंह यांच्या निलंबनाची कारवाई देखील सुरू झाली असल्याचे देखील गृहमंत्र्यांनी सांगितले.

परमबीर यांनी पदभार स्विकारला का?

दरम्यान परमबीर सिंह यांनी पदभार स्विकारला आहे का? असे विचारण्यात आल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टपणे नकार देत त्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत संपर्क साधला नसल्याची माहिती दिली. तसेच परमबीर सिंह सेवेत नसताना त्यांनी सरकारी वाहनाचा वापर करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

प्राथमिक चौकशी केली

वाझे-सिंह भेटीबद्दल साहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी केली आहे. एक उपनिरीक्षक व तीन शिपायांचे जबाब नोंदवल्यानंतर त्याची कागदपत्रे नवी मुंबई पोलिसांना सुपूर्द करण्यात आली. वाझेंसोबत आलेले पोलिस नवी मुंबई पोलिस दलाला संलग्न असल्यामुळे ही कागदपत्रे पुढील कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. हरी बालाजी यांनी सांगितले. या प्रकरणाची गृह विभागाकडून माहिती घेण्यात आली.

देशमुखांच्या वकिलाची नाराजी

न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासमोर अनिल देशमुख यांच्या वकिलांने आपली नाराजी व्यक्त केली. आयोगाने सचिन वाझेंना आयोगासमोर हजर करण्याचे आदेश दिले आणि ताकीद दिली. आमच्याकरता सर्व अधिकारी समान आहेत. यापेक्षा तुम्ही बाहेर थांबा पण कोणाला भेटू नका, कोणाशी बोलू नका. बोलायचे असल्यास, भेटायचे असल्यास कायदेशीर परवानगी घ्या. असे सांगून आयोगाने नाराजी व्यक्त केली.

पाच तास चौकशी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिह यांची सीआयडी कार्यालयात सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. सिंह यांची चौकशी आणखी 4 दिवस चालणार असल्याची माहिती मिळत आहे. चौकशीसाठी नवी मुंबईतील कोकण भवन इमारतीतील सीआयडी कार्यालयात दुपारी तीनच्या सुमाराला ते हजर झाले होते.

बातम्या आणखी आहेत...