आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्याकडे कधीच पैसे मागितले नाही किंवा मीही त्यांना दिले नाही, असा दावा अँटिलिया प्रकरणातील बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याने केला आहे.
अनिल देशमुखांवरील १०० कोटी खंडणी वसुलीचा आरोपांप्रकरणी चौकशी करीत असलेल्या चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेची मंगळवारी उलट तपासणी झाली. यावेळी त्याने जबाब फिरवला. विशेष म्हणजे ईडीला दिलेल्या जबाबामध्ये अनिल देशमुख यांनी आपल्याला खंडणीवसुलीचे कसे आदेश दिले याचे आकडेवारीसह साद्यंत वर्णन वाझे याने केले आहे. त्याच्या अगदी उलट दावे वाझेने राज्य सरकार नियुक्त न्या. चांदीवाल आयोगासमोर केले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप प्रकरणात चांदीवाल आयोगासमोर वकील गिरीश कुलकर्णी यांनी वाझे याची मंगळवारी उलट तपासणी घेतली. देशमुख यांना कधी पैसे द्यावे लागले का ? या प्रश्नावर वाझे म्हणाला, नाही. देशमुख अथवा त्यांच्या स्टाफ मधील कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे पैसे मागितले नाही. तसेच त्यांना कधी पैसे दिले नाही. बार मालक अथवा चालकांकडून खंडणी वसुली करण्यास गृहमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले होते का असे विचारले असता वाझे याने मला आठवत नाही,असे उत्तर दिले. तसेच बार चालक-मालकांकडून पैसे घेतले नाहीत,असे तो म्हणाला. या उलट तपासणीनंतर चांदीवाल आयोगाची पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, चौकशीचे काम तहकुब करण्याची मागणी करणाऱ्या अनिल देशमुख यांना आयोगाने १५ हजार रुपयांची ‘काॅस्ट’ ठोठावली आहे.
अनिल देशमुख १०० कोटी खंडणी वसुली प्रकरण
ईडीने केलेल्या चाैकशीवेळी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप वाझे याने केला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये देशमुख यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत त्यांनी मला मुंबईतील १,७५० बार आणि रेस्टारंटस् ची यादी दिली होती आणि त्यांच्याकडून प्रत्येकी ३ लाख रुपये गोळा करण्यास सांगितले होते. मी त्याप्रमाणे वसुली करून देशमुख यांचा पीए कुंदन शिंदेकडे पैसे नेऊन दिले होते,असा जबाब वाझे यानेे दिला आहे. त्याच आधारावर ईडीने पीएमएलए न्यायालयात देशमुख यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.