आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष:सार्वजनिक गणेश मंडळांकडून दरवर्षी 100 कोटींची रुग्णसेवा, लालबागचा राजा आणि श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट आघाडीवर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो  - Divya Marathi
फाइल फोटो 

सार्वजनिक गणेश मंडळांकडून कोट्यवधी रुपयांची सामाजिक कामे राज्यात होत आहेत. यात पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, मुंबईचा लालबागचा राजा गणेश मंडळ यासारखी मोठी मंडळे आघाडीवर आहेत. दरवर्षी सरासरी १०० कोटींहून अधिक रुपयांच्या निधीतून आरोग्यसेवेचा वसा जपला जात आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दानपेेटीत गणेशोत्सवाच्या काळात अंदाजे ७ ते १० कोटींपर्यंतचे दान पडते. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ३ ते ५ कोटींचे दान मिळते. त्याशिवाय भक्तांनी देवाला वाहिलेले सोन्या-चांदीचे दागिने, पूजा साहित्य या साऱ्याचा धर्मादाय आयुक्तांच्या नियमानुसार लिलाव केल्यानंतर जमा होणारी रक्कमही मंडळाच्या खाती जमा होते. यातून या मंडळांतर्फे शिक्षण आणि आरोग्यसेवेची मोठी कामे उभारली जात आहेत. याप्रमाणेच अन्य मंडळांतर्फेही गणेशभक्तांच्या दानातून रुग्णवाहिका, आरोग्य शिबिरे, किफायतशीर उपचार यासारखे सेवायज्ञ सुरू असतात.

"लालबागच्या राजा'तर्फे वर्षाला ३० हजार डायलिसिस कोरोनानंतर २०२० चा गणेशोत्सव या मंडळातर्फे "आरोग्योत्सव' म्हणून साजरा करण्यात आला. त्या वेळी महारक्तदान शिबिर, प्लाझ्मा दान शिबिरे घेण्यात आली. त्याशिवाय मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरमध्ये गरीब रुग्णांसाठी अवघ्या १०० रुपयांत डायलिसिसची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी २४ मशीन्सद्वारे दरवर्षी ३० हजार डायलिसिस केले जातात. यासोबतच ३ हजार रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पूरग्रस्तांना औषधे वाटप, मोफत योग वर्ष चालवले जातात. मंडळातर्फे त्रैमासिक रक्तदान शिबिरे घेण्यात येतात.

दगडूशेठ ट्रस्टतर्फे १५ हजार रुग्णांना सकस आहार पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून कोरोनाकाळात वाड्या-वस्त्यांमधील गरजू कुटुंबे, सुरक्षा कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी या साऱ्यांना सकस आहार पुरवण्यात आला. २०१३ पासून पुण्यातील ससून रुग्णालयातील १२०० रुग्णांसाठी मंडळातर्फे दररोज दोनवेळचा सकस आहार, अल्पोपाहार देण्यात येतो. याच रुग्णालयात ट्रस्टच्या देणगीतून सुसज्ज अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला आहे. ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या पिताश्री वृद्धाश्रमात दरवर्षी ७५ वृद्धांची काळजी घेण्यात येते. बालसंगोपन केंद्रात २ हजार वंचित बालकांचे संगोपन, आरोग्य व शिक्षण याची व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...