आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पालिकेचा दणका:कोरोनाच्या शुल्कात 11 टक्के घट; 1100 प्रकरणांत दीड कोटी वसूल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी मुंबईतील अनेक भागांमध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली.
  • जादा शुल्क लावलेल्या 37 रुग्णालयांना फटकारले

कोरोना रुग्णांवरील उपचारात मनमानी शुल्क आकारलेल्या मुंबईतील खासगी रुग्णालयांना पालिकेने धडा शिकवला आहे. अवाजवी शुल्क आकरल्याच्या अकराशेपेक्षा अधिक तक्रारींची तपासणी करून ३७ खासगी रुग्णालयांकडून दीड कोटीची रक्कम वसूल केली आहे. पालिकेच्या या झाडाझडतीमुळे मुंबईतील खासगी रुग्णालयांतील कोरोना रुग्णांच्या शुल्कात ११ टक्के घट झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

कोरोना विषाणू उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारणी (बिल) होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांसाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. आजपर्यंत ३७ रुग्णालयांतील ६२५ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तसेच अन्य ४९० तक्रारींमध्येदेखील कार्यवाही केली आहे. अशा एकूण १,११५ तक्रार प्रकरणात १ कोटी ४६ लाख ८४ हजार रुपये रकमेची आजवर परतफेड करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या १,११५ प्रकरणातील मूळ देय रक्कम एकूण १४ कोटी एक लाख इतकी होती. या प्रकरणांमध्ये झालेल्या तक्रारी आणि सूचना यांचा विचार करून लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी सर्व नियम तपासून कार्यवाही केली. पडताळणीअंती या देयकांची योग्य फेरआकारणी करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या. परिणामी या सर्व प्रकरणातील बिलांची रक्कम कमी होऊन १२ कोटी ५४ लाख रुपये इतकी झाली. मूळ देयक आकारणीचा विचार करता सुमारे १०.४८ टक्क्यांनी देयकांची रक्कम कमी झाली.

पालिकेकडून दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती : महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा महानगरपालिकेने ताब्यात घेण्याचे ठरवले. या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून कोणत्या दराने शुल्क आकारणी केली पाहिजे याबाबत राज्य शासनाने ३० एप्रिल २०२० रोजी आदेश काढला. या आदेशात आणखी सुधारणा करून सुधारित आदेश २१ मे २०२० रोजी जारी करण्यात आले. असे असले तरी खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करीत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याच्या खातरजमेसाठी २ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे बिल आकारणीबाबत तक्रारींचा निपटारा होत आहे.

रुग्णांच्या नातेवाइकांना तक्रार करण्याची मुभा

एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्यायदेखील महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयासाठी ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे तक्रार नोंदवता येते.