आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात आज 328 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक मुंबईत 118 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर पुण्यात 78 जणांची कोरोनाची बाधा झाली आहे. यासोबत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3648 वर पोहोचला आहे. मुंबई, पुण्यातील वाढती रुग्णांची संख्या सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन आणि भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी आज संध्याकाळी अभिनेता एजाज खानला मुंबईत अटक करण्यात आली.
आज राज्यात 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 5 मुंबई, 4 पुणे, ठाणे आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी 1 मृत्यू झाला. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 67,468 नमुन्यांपैकी 63,476 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 3648 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यात सध्या 344 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 5994 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 23 लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केलं आहे. आजपर्यंत 365 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 82,299 लोक होम क्वॉरंटाईन असून 6999 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
भंडाऱ्यात दोन कोरोना संशयितांचा मृत्यू
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी समोर आली आहे. या दोघांनाही कोरोना संशयितांच्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. याच दरम्यान दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यातील एकाचे वय 70 तर दुसऱ्या रुग्णाचे वय 50 होते. सोबतच, एकाला मधुमेह तर दुसऱ्याला कर्करोग देखील होता. या दोघांचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. विशेष म्हणजे, भंडारा जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
साखर कारखान्यातील कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्याचा सरकारचा निर्णय
राज्य सरकारने 1 लाख 31 हजार 500 साखर कारखान्यातील कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे कामगार छावण्यांमध्ये राहत आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, ज्या मजुरांना या शिबीरात राहून 14 दिवस झालेत त्या सर्वांची चाचणी केली जाईल. त्यांच्या रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था केला जाईल.
औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सुखरूप डिलिव्हरी
कोरोना आणि लॉकडाउनने देशासह जगभरात दहशत माजवली आहे. अशात राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक पॉझिटिव्ह वृत्त समोर आले आहे. येथील एका कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आई सध्या उपचाराला प्रतिसाद देत असून तिच्या बाळामध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे अद्याप दिसून आलेली नाही असे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
औरंगाबाद मध्ये कोरोनाचा तिसरा बळी
औरंगाबाद मध्ये कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. 65 वर्षीय महिलेचा घाटीत मृत्यू घाटी रुग्णालयात सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी महिलेचे निधन झाले. ही महिला बिस्मिल्ला कॉलनीमध्ये राहत होती. सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 13 तारखेला त्यांना घाटीत भरती करण्यात आले होते. सुरुवातीपासून या महिलेची प्रकृती गंभीर होती. दुसरीकडे 15 वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह आढळला आहे. मुलगा बायजीपुरा मधील महिलेचा मुलगा आहे
शुक्रवारपर्यंत रुग्णांचा तपशील
मुंबई मनपा २०८५, ठाणे २९, ठाणे मनपा ९६, नवी मुंबई ६३, कल्याण डोंबिवली ६८, उल्हासनगर १, भिवंडी निजामपूर १, मीरा भाईंदर ५३, पालघर १४, वसई विरार ६१, रायगड ८, पनवेल २८, नाशिक मंडळ ८४, पुणे मंडळ ५२३, कोल्हापूर मंडळ ३८, औरंगाबाद मंडळ ३२, लातूर मंडळ १२, अकोला मंडळ ५४, नागपूर ६०, इतर राज्ये ११.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.