आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणारे 118 बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केलेल्या ११८ राज्य परिवहन महामंडळाच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

२०२१ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घ संपकाळात सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती. या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा ५ महिने संप चालला होता. संप चिघळल्याने कर्मचाऱ्यांनी आपला रोष प्रकट करण्यासाठी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या घरावर हल्ला केला होता. निदर्शनांत त्यांनी चपलाही फेकल्या होत्या. याप्रकरणी ११८ एसटी कर्मचाऱ्यांना अटक केली हेाती. या कर्मचाऱ्यांना पवार यांच्या घरावर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक, सीएनजी बस : शिंदे लोकसंख्येचा भार वाढला आहे. त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या मात्र कमी असून ही संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दीडशे इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्त्वावर घेतली जाणार असून ५०० नवीन डिझेल बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. सुमारे एक हजार बसगाड्यांचे सीएनजीमध्ये रूपांतरण करण्यात येत असून जून २०२३ पर्यंत सुमारे दोन हजार इलेक्ट्रिकवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे, मुख्यमंत्री शिंदेंनी न्याय दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला म्हणून ११८ कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावरून उद्धव ठाकरे सरकारने या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते, आज त्यांना परत कामावर घेण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. - गुणरत्न सदावर्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील

...इकडे रश्मी शुक्लांना पाेलिसांची क्लीन चिट पुणे | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, माजी खा. संजय काकडे, माजी आ. आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान आता याचा क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी तत्कालीन पोलिस उपायुक्तांची कसून चौकशी केली. शुक्ला पोलिस आयुक्त असताना हे प्रकरण घडल्याने त्या वेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस उपायुक्तांचीही चौकशी करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...