आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात सोमवारी १२ हजार १६० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ११ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाचा मृत्युदर २.१ टक्के एवढा आहे. मुंबईत सोमवारी ८ हजार ८२ रुग्ण आढळले असून मुंबईतील ८० टक्के रुग्ण ओमायक्राॅन विषाणुबाधित असल्याचा दावा मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केला आहे. मात्र, मुंबईत सोमवारी आढळलेल्या ८ हजार रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत हे विशेष.
रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महापालिकांनी ४ ते ३१ जानेवारीपर्यंत इयत्ता पहिली ते अकरावीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी इतर विभागांतील शाळा सुरूच राहणार आहेत, अशी भूमिका राज्य शिक्षण विभागाने सोमवारी स्पष्ट केली. इकडे, बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असून कोरोनाचे निर्बंध आणखी कठोर होतील, अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरू लागला आहे.
त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई क्षेत्रातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा ४ ते ३१ जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसा निर्णय या तीन महापालिकांनी सोमवारी जारी केला आहे. मात्र, ऑनलाइन शाळा सुरू राहणार आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील १० आणि १२ वीचे वर्ग वगळता अन्य सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्ययनासाठी बंद ठेवून ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहेत.
रुग्णस्थिती :⦁ दाखल रुग्णांमध्ये १९ टक्के रुग्णांना आॅक्सिजन लागतो आहे. १० टक्के रुग्ण गंभीर होत असून ६९ टक्के सौम्य लक्षणाचे रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत आहेत. ⦁ चाचण्यांपैकी ८९ टक्के रुग्ण निगेटिव्ह आढळत असून ११ टक्के रुग्ण पाॅझिटिव्ह सापडत आहेत. यामध्ये ५९ टक्के रुग्ण पुरुष असून ४१ टक्के रुग्ण महिला आहेत. ⦁ १ ते १० वर्षांपर्यंतच्या बालकांची रुग्णसंख्या ३.१८ टक्के आहे. ११ ते २० वयोगटातील ७.४७ रुग्ण आहेत. सर्वाधिक २२ टक्के ३१ ते ४० या वयोगटातील आहेत.
मुंबईपाठोपाठ पुण्यातही शाळा बंदचे संकेत
मुंबईमधील कोरोनाबाधितांच्या वाढीमध्ये ओमायक्रॉनचाच हात असल्याचे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे. सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रुग्ण ओमायक्रॉनबाधित असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, मंुबईपाठोपाठ पुण्यातही शाळा बंद करण्याचे संकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.
राज्यात इतर जिल्ह्यांमधील शाळा सुरूच राहणार; सोमवारी १२,१६० नवे कोरोना रुग्ण, तर ६८ ओमायक्रॉनबाधितांची नोंद, दिवसभरात १,७४८ रुग्ण बरे
राज्यात सोमवारी ६८ ओमायक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील मुंबई - ४०, पुणे मनपा - १४, नागपूर - ४, पुणे ग्रामीण आणि पनवेल - प्रत्येकी ३, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा प्रत्येकी १ असे रुग्ण आढळले आहेत. राज्यात ओमायक्राॅनचे एकूण ५७८ रुग्ण होते. सोमवारी राज्यात १२ हजार ४६० नवे कोरोना रुग्ण आढळले. १,७४८ रुग्ण बरे होऊन परतले, तर ११ मृत्यूंची नोंद झाली. बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के आहे.
मुंबईबाहेरील शाळा सुरूच राहणार : शिक्षणमंत्री
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मेट्रो शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शाळा सुरूच राहतील. या ठिकाणी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. भविष्यात रुग्ण वाढल्यास स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
मुंबईतील ९० टक्के रुग्ण लक्षणेविरहित
मुंबईत सोमवारी ८,०८२ रुग्ण आढळले. त्यापैकी ७,२७३ म्हणजे ९० टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. ५,७४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ७१ रुग्ण आॅक्सिजन बेडवर आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत सोमवारी ४९ हजार २८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.