आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निवडणूक:13 अपक्षांच्या साथीने आघाडीची भक्कम तटबंदी; 165 आमदारांची हजेरी, 9 आमदारांबाबत निश्चितता

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी राज्यात तीन पक्षांच्या सरकार स्थापनेवेळी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या आमदारांची एकजूट करण्याची रणनीती आखली होती, त्याच पद्धतीने मंगळवारी राज्यसभा निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अपक्ष व छोट्या पक्षांचे १३ आमदार मंगळवारी ट्रायडंट हॉटेलमध्ये आघाडीने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित होते. त्यामुळे शुक्रवारी (१० जून) होत असलेल्या सहा जागांच्या निवडणुकीत आघाडीचे ४ सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार असे संकेत दिसत आहेत. दरम्यान, भाजपची बुधवारी बैठक होत असून त्या बैठकीत रणनीती स्पष्ट होणार आहे.

बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील व निवडणूक प्रभारी मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. ‘कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. राज्यसभेच्या चारही जागा निवडून आणायच्या आहेत. आपले ऐक्य दाखवा,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना केले. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दाखवून दिले कसे लढाई लढतात. ती पुरून उरली. त्यांच्याकडेही असेच वातावरण तयार केले होते. आपण लढू आणि जिंकू”, असे मुख्यमंत्री यावेळी आमदारांना उद्देशून म्हणाले.

शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांवर विश्वास व्यक्त केला. ‘या निवडणुकीत कुणीही फुटणार नाही. त्यामुळे आपलेच उमेदवार जिंकून येणार’, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर आणखी भर दिला जाणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले. आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून सरकारचे काम केले पाहिजे, अशी सूचना करुन एकप्रकारे पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे कान टोचले.

बैठकीला काँग्रेसचे ४४ आमदार येणे अपेक्षित होते. फक्त ३२ आमदार उपस्थित होते. शिवसेनेचे ५५ पैकी फक्त ४५ आमदार पोहोचू शकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ पैकी ४२ आमदार बैठकीला आले होते. बैठकीला अपक्ष व छोट्या आमदारांपैकी १३ आमदारांनी उपस्थिती लावली होती. अनेकांना वेळेत पोहोचता आले नाही, असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला. ईडी व पैशाचे अमीष दाखवून घोडेबाजार करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केला.

निर्णय प्रलंबित : बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी २, एमआयएम २, प्रहार जनशक्ती २, असे ९ सदस्य अनुपस्थित होते.

भाजपचे पाठिराखे : मनसे १, जनसुराज्य १, रासप १, राजेंद्र राऊत, रवी राणा, महेश बालदी, प्रकाश आवाडे असे ७ सदस्य भाजपचे पाठीराखे आहेत.

आमदार सुरक्षित स्थळी
- काँग्रेसचे सर्व आमदार ट्रायडंट हॉटेलात राहणार आहेत.
- सेनेच्या आमदारांना मंगळवारी मढ आयलंडच्या रिट्रीट हॉटेल येथून ट्रायडंटला आणले.
- राष्ट्रवादी आमदारांचा पवईच्या रेनेसाँ हॉटेलात मुक्काम.

बैठकीला उपस्थित आमदार
ट्रायडंटमधील बैठकीस भाकपचे विनोद निकोले, स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार, शेकापचे श्यामसुंदर शिंदे तसेच अपक्ष नरेंद्र भोंडेकर, चंद्रकांत पाटील, संजय शिंदे, किशोर जोरगेवार, गीता जैन, मंजुळा गावीत, विनोद अग्रवाल, आशिष जैस्वाल, शंकरराव गडाख, राजेंद्र यड्रावकर असे अपक्ष व छाेट्या पक्षांचे १३ आमदार उपस्थित होते.

दिव्य मराठी विश्लेषण । दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच सहा जागांचे भवितव्य ठरणार
आघाडीने पहिल्या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची प्रत्येकी ४५ मते देण्याचे निश्चित केले आहे. परिणामी, सहावा उमेदवार ४२ मतांचा कोटा पूर्ण करू शकणार नाही. भाजपनेही आपल्या तिसऱ्या उमेदवारास दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच निवडून येण्याच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांचा आधारे सहावी जागा जिंकली जाणार आहे. सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात चुरस आहे.

शिवसेना : पहिल्या पसंतीची ४५ मते संजय राऊत यांना तर दुसऱ्या पसंतीची सर्व मते संजय पवार यांना देणार. राष्ट्रवादीची दोन मते कमी होण्याची शक्यता. त्यानुसार तयारी.
एकनाथ शिंदे - अनिल परब यांच्या हाती मतांच्या जुळवाजुळवीची सूत्रे.

राष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल यांना ४५ मते देणार. उर्वरित पहिल्या पसंतीची ८ तर दुसऱ्या क्रमांकाची सर्व मते संजय पवारांना. देशमुख, नवाब मलिक यांची मते अनिश्चित.
अजित पवार - जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या आमदारांची व्यवस्था

काँग्रेस : आपली सर्व ४४ मते स्वपक्षीय उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना देणार. दुसऱ्या क्रमांकाची सर्व मते शिवसेनेच्या संजय पवार यांना देणार आहे.
काँग्रेसची सूत्रे अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हाताळत आहेत.

भाजप : सर्व १०६ सदस्यांची दुसऱ्या क्रमांकाची मते तिसऱा उमेदवार धनंजय महाडीक यांना देणार. राष्ट्रवादीची दोन मते कमी झाल्यास महाडिक यांना अधिक लाभ मिळेल.
देवेंद्र फडणवीस नागपूरहून सुत्रे हलवित आहे. तर चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्याकडे मुंबईची जबाबदारी.

अपक्ष : आघाडीला मतदान करणाऱ्या आमदारांनी पुढच्या दोन वर्षांत मतदारसंघात किमान १०० कोटींची विकासकामे करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून वचन घेतले.

छोटे पक्ष : मतदारसंघातील सर्व कामे करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

अनिल देशमुख, मलिकांविषयी अनिश्चितता
राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अर्जावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. ईडीने दोघांच्या मतदानास विरोध दर्शवला. न्यायालयाचा निर्णय बुधवारी (८ जून) येईल.

पुढे काय ? संजय पवार पराभूत झाल्यास सरकारच्या स्थैर्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. विरोधक अविश्वास ठराव आणू शकतात. भाजप उमेदवार पराभूत झाल्यास आघाडी सरकार, विशेषत: शिवसेना आक्रमक होईल.

बातम्या आणखी आहेत...