आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात अवकाळी पावसामुळे ८ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागवण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली. दरम्यान, अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावावर तातडीने चर्चा करण्याची मागणी फेटाळल्याने राष्ट्रवादीसह विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला बुधवारपासून सुरुवात झाली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच राज्यात गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार,नाना पटोले, छगन भुजबळ यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला माहिती दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानीसंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री धुळवडीत दंग - अजित पवार : गेले दोन दिवस अवकाळी पाऊस, गारपिटीने हातातोंडाशी आलेली पीके पूर्णपणे उध्वस्त झाली. पीकांच्या नुकसानीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर र्आर्थिक संकट आले असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यासंदर्भात सरकारने तातडीने सभागृहात चर्चा करावी, अशी जोरदार मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान केली. चर्चेची मागणी फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी फेटाळल्याने विधानसभेत विरोधकांचा सभात्याग विरोधकांचे मगरीचे अश्रू : उपमुख्यमंत्री
सभात्याग करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. आघाडी सरकार असताना शेतकऱ्याच्या नुकसानीचे सात हजार कोटी आमच्या सरकारने दिले. विरोधक हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत. त्यांचे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांचे वाभाडे काढले.
सर्वाधिक ४१०० हेक्टर नुकसान नगर जिल्ह्यात : पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे ७६० हेक्टर, नाशिक जिल्ह्यात २,६८५ हेक्टर, धुळे येथे ३,१४४ हेक्टर, नंदुरबार येथे १,५७६ हेक्टर, जळगाव येथे २१४ हेक्टर, अहमदनगर येथे ४,१०० हेक्टर, बुलडाणा येथे ७७५ हेक्टर, तर वाशिम जिल्ह्यात ४७५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
मराठवाडा : हिंगोलीत वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
प्रतिनिधी | हिंगोली
सेनगाव तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात शेतात हरभरा पीक झाकत असताना वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (७ मार्च) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. विलास शामराव गव्हाणे (४०) असे शेतकऱ्याचे नाव आहे. पत्नी व दोन मुले दूर अंतरावर असल्याने ते बालंबाल बचावले. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे पडले असून संत्रा, मोसंबी तसेच आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत वीज पडून सहा जनावरे दगावली असून यात चार गायी व दोन म्हशींचा समावेश आहे. यापैकी दोन गायी व एक म्हैस भोकरदन, तर दोन गायी व एक म्हैस जाफराबादेतील असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. आठही तालुक्यांत मिळून एकूण १.३० मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे पर्जन्यमापकावरील नोंदीत म्हटले आहे, मात्र पिकांच्या नुकसानीची आकडेवारी बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त नव्हती.
नाशिक जिल्ह्यात बेलगाव ढगा, देवळ्यात गारपीट, द्राक्षांचे नुकसान
नाशिक | बेलगाव ढगा आणि देवळा तालुक्यातील चिंचबारी, वाखारी परिसरात बुधवारी जोरदार गारपीट झाली. दहीवडमध्ये शाळेचे पत्रे उडाले. बेलगाव ढगा येथे संतोषी आणि भागडी डोंगर परिसरात दुपारी गारपिटीत पोपट कर्डिले यांच्या निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागल्याने मातीमोल किमतीने व्यापारी त्यांच्याकडे द्राक्ष मागत आहेत.
राज्यात आजपासून तापमानात होणार वाढ, विदर्भ अपवाद
नाशिक | गुरुवारपासून ९ मार्चपासून राज्यात पावसाळी वातावरण स्वच्छ होणार असून तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. मुंबई व कोकणात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. परंतु विदर्भातील ११ जिल्ह्यांत तीन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.